आघाडी आणि एमआयएमला का मिळाला भोपळा

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने प्रत्येकी एका जागी विजय मिळविला होता. यंदा मात्र या पक्षांच्या हाती भोपळा आला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील गटबाजी, नेत्यांची उदासीनता तर "एमआयएम'ला वंचित आघाडीसोबतची फारकत चांगलीच भोवली. लोकसभा निवडणुकीत मध्य, पूर्व, पश्‍चिममध्ये भरघोस मते मिळविणाऱ्या "एमआयएम'ला विधानसभा निवडणुकीत झटका बसला आहे. 



शहरात दोन शिवसेना, एक भाजप 
शहरातील तीनही मतदारसंघांत चांगलीच चुरस बघायला मिळाली. पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 34 उमेदवार मैदानात होते. यामध्ये प्रमुख लढत भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात होती. यासोबत समाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी, कॉंग्रेसने पाठिंबा दिलेले युसूफ मुकाती हे मैदानात होते. लोकसभा निवडणुकीत पूर्वमधून एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 92 हजार 247 मते मिळाली होती. तथापि, या निवडणुकीत 13 मुस्लिम उमेदवार मैदानात असल्याने तसेच सपा आणि कॉंग्रेसपुरस्कृत उमेदवार मुस्लिम असल्याचा फटका कादरी यांना बसला. सावे यांनी 93 हजार 345 मते मिळवून विजय मिळविला. 


मध्य मतदारसंघात 2014 मध्ये मतविभाजनाचा फायदा घेत एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. मात्र, यंदा हा मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. येथे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना 82 हजार 217 मते मिळाली. त्यांनी 13 हजार 892 मतांनी विजय मिळविला. लोकसभा निवडणुकीत येथे एमआयएमला तब्बल 99 हजार 450 मते मिळाली होती. मात्र वंचित आघाडी सोबत नसल्याने नासेर सिद्दीकी यांना 68 हजार 325 मते मिळविता आली. वंचित आघाडीचे अमित भुईगळ यांनी 27 हजार 302 मते मिळविली. राष्ट्रवादीचे अब्दुल कदीर मौलाना यांनी घेतलेल्या 7 हजार 290 मतांचाही फटका नासेर सिद्दीकी यांना बसला. तसेच नाराज असलेले जावेद कुरैशी यांच्यामुळे एमआयएमला तोटा सहन करावा लागला. 


पश्‍चिम मतदारसंघात शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी हॅट्ट्रिक केली. भाजपचे बंडखोर राजू शिंदे हे मैदानात असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र त्यांनी सगळ्यांवर मात करीत विजय मिळविला. वंचित आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार स्वतंत्रपणे मैदानात असल्याने त्याचा फायदाही त्यांना झाला. शिरसाट यांनी 40 हजार 54 मतांनी विजय मिळविला. 


ग्रामीणमध्ये युतीचाच बोलबाला 
ग्रामीणमधील सहा मतदारसंघांपैकी सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूरमध्ये शिवसेना तर फुलंब्री, गंगापूरमध्ये भाजपने विजय मिळविला. 2014 मध्ये वैजापूर राष्ट्रवादी, तर सिल्लोड कॉंग्रेसकडे होते. सिल्लोड मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस सोडून शिवबंधन हातात बांधले. त्यांच्याविरोधात प्रभाकर पालोदकर यांनी कॉंग्रेसचे तिकीट नाकारून भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. शेवटच्या क्षणात ही निवडणूक धर्म, जातीवरसुद्धा आली होती. येथे सत्तार यांनी 1 लाख 23 हजार 383 मते घेऊन 24 हजार 381 मतांनी विजय मिळविला. अपक्ष प्रभाकर पालोदकर यांना 99 हजार 2 मते मिळाली. 


गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांब बंब यांनी हॅट्ट्रिक केली. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले संतोष माने यांचा पराभव केला. बंब यांना 1 लाख 7 हजार 193, तर संतोष माने यांना 72 हजार 222 मते मिळाली. 


कन्नडमध्ये लक्षवेधी लढत होती. येथे सलग दोनवेळा विजयी झालेले अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांनी पराभव केला. येथे राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे यांनीही टक्कर दिली. पैठण मतदारसंघात संदीपान भुमरे यांनी सलग चौथ्यांदा विजय संपादन केला. त्यांना 83 हजार 403, तर राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांना 67 हजार 264 मते मिळाली. वैजापूरमधून मागील वेळेस राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विजयी झाले होते; मात्र यंदा शिवसेनेचे प्रा. रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीकडून ही जागा हिसकावून घेतली.

फुलंब्री मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्या लढतीची चर्चा होती. हरिभाऊ बागडे यांना 1 लाख 5 हजार 655, तर कल्याण काळे यांना 90 हजार 539 मते मिळाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com