लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

विकास देशमुख
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

हाॅटेलमध्ये बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट असते. या मागे नेमके काय कारण आहे, या बाबत eSakal.com ने जाणून घेतलेली खास माहिती. 

औरंगाबाद - पांढऱ्या रंगाचे कपडे लवकर मळतात. त्यामुळे एकाच दिवसात त्यांना धुवावे लागते. असे असतानाही हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाउस यापैकी कुठेही गेले तर बेडवर पांढऱ्याशुभ्र रंगाची चादर (बेडशीट), टाॅवेल असते. एवढेच नाही तर उशांनाही पांढऱ्या कापडाचीच कव्हर असते. या मागे नेमके काय कारण आहे, या बाबत eSakal.com ने जाणून घेतलेली खास माहिती. 
  
काहीही करा; हॉटेलच आहे 
आपण हॉटेलमध्ये 24 तासांचे भाडे दिलेले आहे. त्यामुळे पूर्ण पैसे वसूल करण्याच्या मानसिकतेतून काही जण खूप गोंधळ घालतात. त्यात बॅचलर तरुण असतील तर विचारायलाच नको. त्यांना वाटते की हॉटेलमधील बेडशीट आणि टाॅवेल आपल्याला धुवावी लागत नाही; त्यामुळे ती जितकी खराब करता येईल तितकी करा, या मानसिकतेतून काही जण ती घाण
करतात.

ग्राहकांची ही मानसिकता माहीत असूनही सर्वच हॉटेलमध्ये पांढरी बेडशीट वापरली जाते. याचे कारण विचारले असता औरंगाबादमधील हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मनगटे म्हणाले, "ग्राहकांचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न कुठलेही हॉटेल व्यवस्थापन करते. ग्राहक स्वच्छता, साफ-सफाई पाहूनच हॉटेलमधील खोलीची निवड करतात. जर बेडवर पांढऱ्या रंगाची स्वच्छ चादर आणि उशांना पांढऱ्या रंगाचीच कव्हर असेल तर ग्राहकांना प्रसन्न वाटते. ही चादर पाहूनच रूममधील साफ-सफाईचा अंदाज येतो. चादर एवढी स्वच्छ असेल तर हॉटेल आणि रूमही स्वच्छ असणार; शिवाय हॉटेलमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले जाते, अशी ग्राहकांची मानसिकता होऊन तो तत्काळ रूम बुक करतो. एकूणच काय तर पांढरा रंग स्वच्छतेचे प्रतीक असल्यामुळे पांढऱ्या रंगाची चादर हॉटेलमध्ये वापरली जाते'', अशी माहिती त्यांनी दिली. 
  

Image result for White Bedsheets Hotels

वाढतो खर्च 
पांढऱ्या चादरीमुळे हॉटेल व्यवस्थापनाच्या खर्चात अधिक भर पडते. एक तर या चादर आणि उशांच्या कव्हर रोज धुवाव्या लागतात. शिवाय त्यावर जर चुकून अन्न, सॉस, पेनाची शाई पडली तर न धुवून निघणारा डाग तयार होतो. त्यामुळे अशी चादर नंतर वापरता येत नाही. आठवड्यातून एकदा तरी असा प्रकार हमखास घडतोच. त्यामुळे हॉटेल मालकांसाठी पांढऱ्या चादरी वापरणे खर्चिक आहे. 

Image result for White Bedsheets Hotels

 

कधीपासून झाली सुरवात 
साधारणतः 30 वर्षांपूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकात हॉटेलमध्ये रंगीबेरंगी चादरींचा वापर केला जात होता. त्यात कितीही डाग पडले तर ते लपून राहतील, अशाच रंगाचा वापर हॉटेलमालक करत होते; पण नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला पाश्‍चिमात्य देशातील देशातील हॉटेलच्या मालकांनी अभ्यास करून पांढऱ्या रंगाच्या बेडशीटचा वापर सुरू केला. आज हा ट्रेंड
जगभर पाहायला मिळतो. 
 

हेही वाचा - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या

ग्राहक होतात रिलॅक्‍स 
पांढरा रंग जसा स्वच्छतेचा प्रतीक आहे तसाच तो शांतीचेही प्रतीक आहे. त्यामुळे पांढरीशुभ्र चादर पाहून ग्राहक तणावमुक्त होतो. रिलॅक्‍स वाटून आनंदी वातावरण निर्माण होते. म्हणूनच हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे, असेही श्री. मनगटे यांनी सांगितले. 

हेही वाचा - दहा दिवस उलटू द्या, भाजपचेच सरकार येईल : इम्तियाज जलील   
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why only White Bedsheets, Towels being used in Hotels