का दिली महिला ‘बिडीओ’ ला धमकी..? 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

0- अर्धापूर पंचायत समितीमधील प्रकार
0- महिलांसह आदी कर्मचारी भयभीत
0- एकेरी भाषेत शिविगाळ, धमकी
0- अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा

नांदेड : अर्धापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात घुसून शिविगाळ केली. एवढेच नाही तर तुम्ही पुरष असता तर पहिल्या माळ्यावरून फेकुन दिले असते अशी धमकी देणाऱ्या एकावर अर्धापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. दोन) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार ता. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरच्या सुमारास घडली. 

अर्धापूर येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिना जान्या रावताळे (वय ३२) ह्या नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात शासकिय काम करीत होत्या. यावेळी कुठलीच परवानगी न घेता महिला अधिकारी असल्याची माहिती असताना नांदला- दिग्रस (ता. अर्धापूर) येथील शशी पाटील उर्फ शशिकांत क्षिरसागर (वय ४०) हा त्यांच्या कार्यालयात घुसला. ग्रामपंचायत नांदला दिग्रसच्या १४ व्या वित्त आयोगाच्या कामाचे काय झाले. कामाच्या आदेश का काढला नाही असे म्हणून महिला अधिकाऱ्यास एकेरी भाषेत बोलून त्यांचे खच्चीकरण केले. 

पहिल्या मजल्यावरून फेकून दिले असते

एवढेच नाही तर तुम्ही पुरूष अधिकारी असता तर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले असते. असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. महिला असल्याने वाचलात असे एकेरी भाशेत बोलून त्यांच्या टेबलवर जोरजोराने हात मारून दहशत पसरविली. हा प्रकार कार्यालयीन वेळेत घडल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा धक्का बसल्याने भयभीत झालेल्या रावताळे यांनी सोमवारी (ता. दोन) अर्धापूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शशी पाटीलविरुध्द भारतीय दंड विधान संहितेनुसार शासकिय कामात अडथळा, शिविगाळ करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साईनाथ सुरवसे करीत आहेत. 

सर्व सामान्याना डोळ्यासमोर ठेवावे

शासकिय काम करत असतांना अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागते. एखाद्या शासकिय कामासाठी खेटे मारून जर काम वेळेत होत नसेल तर नागरिकांचा संयम संपतो. त्याचे परिणाम अशा प्रकारे वाईट उमटतात. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या टेबलवर आलेले काम वेळेत मार्गी लावले तर अशा घटना घडणार नाहीत. तसेच नागरिकांनीही कामाचा व्याप व प्रक्रिया लक्षातघेऊन शक्य झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदत करावी अशा भावना या निमित्ताने बोलून दाखविल्या जात आहेत.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why threaten women 'bidio' ..?