पत्नीला जन्मठेपेची शिक्षा

file photo
file photo

औरंगाबाद : विषारी बिया टाकलेली भाजी खाल्यानंतर प्रकृती खराब झालेल्या पतीचा गळा दाबून खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप व विविध कलमांन्वये सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी ठोठाविली. बरोबरच मृतावर अवलंबून असलेल्या अल्पवयीन तीन मुलांना जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाने नुकसानभरपाई देण्याचे व त्यांचे पुनर्वसन करून त्याचा अहवाल चार आठवड्यांत न्यायालयात सादर करण्याचे आदेशदेखील जिल्हा व विधी सेवाप्राधिकरणाला न्यायालयाने दिले. संगीता आव्हाड असे त्या आरोपीचे नाव आहे. 

प्रकरणात मृत विलास आव्हाड (वय 40, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांची बहीण अनिता भालेराव (28,रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, राजनगरामध्ये विलास आव्हाड आपल्या कुटुंबीयासोबत किरायाच्या घरामध्ये राहत होते. विलास यांना चार मुले असून त्यापैकी मोठ्या मुलाचा विवाह झाला आहे. दरम्यान, 28 मे 2016 रोजी विलासची पत्नी तथा आरोपी संगीता आव्हाड (35) आणि तिचा मोठा मुलगा हे दोघे विश्रांतीनगरात राहणाऱ्या नणंद अनिता भालेरावच्या घरी गेले होते, तेथे पती विलास रात्रीपासून घरी आलेच नसल्याचे सांगितले. त्यावर अनिता यांनी आपण पोलिस ठाण्यात तक्रार देऊ, असे म्हटले असता संगीताने तेथून काढता पाय घेतला होता. 

...अन्‌ गाठले माहेर 
संगीताच्या सुनेला संगीताच्या कटकारस्थानाचा सुगावा लागल्याने दोन जून 2016 रोजी ती किनगावराजा येथे माहेरी गेली. तेथे तिने वडिलांना सासऱ्याचा खून करण्यात आल्याचे सांगितले. त्याआधारे तिच्या वडिलांनी तिची आजेसासू (विलासची आई) शांताबाईला तातडीने किनगावराजाला बोलवून घेतले. तिला सर्व हकीकत सांगितली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

विष दिले अन्‌ मृतदेह पुरला 
पोलिसांनी आरोपी संगीताच्या सुनेचा जबाब नोंदविला. त्यात तिने सासू संगीता, पती आणि देवळाई येथे राहणाऱ्या शेख गफार शेख या तिघांनी संगनमत करून सासऱ्याचा खून करून मृतदेह चिकलठाणा परिसरातील शेडमध्ये पुरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेडमधील कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. डॉक्‍टरांच्या अहवालानुसार विलासचा गळा दाबून खून करण्यात आला होता. प्रकरणात आरोपींविरोधात कलम 302, 201 व 34 भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

असा झाला युक्तिवाद 
प्रकरणाच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी 14 साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात मृताची सून, रिक्षाचालक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी संगीता आव्हाडला दोषी ठरवून जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, इतर कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. आरोपीचा मुलगा गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बाल न्यायालयात प्रलंबित आहे. तर शेख गफारची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com