नांदेड मनपात ‘हा’ वाघ दिसणार का?

अभय कुळकजाईकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेत सर्वांना भारी ठरणारा आणि वेळोवेळी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणारा एकमेव असलेला वाघ आता दिसणार का? याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. 

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेत सर्वांना भारी ठरणारा आणि वेळोवेळी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणारा एकमेव असलेला वाघ आता दिसणार का? याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. 

नांदेड महापालिकेची २०१७ मध्ये निवडणुक झाली त्यावेळी शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजपात घमासान झाले आणि दोघेही एकमेकांवर तुटुन पडल्याने त्याचा फायदा विरोधकांना झाला. ८१ पैकी तब्बल ७३ जागा कॉँग्रेसला मिळाल्या तर दुसरीकडे भाजपला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे तर महापालिकेत सत्तेची चव चाखलेल्या तसेच अनेक वेळा विरोधी पक्षनेतेपदी राहिलेल्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली. ती देखील एका सच्च्या शिवसैनिकांच्या कामांमुळे....बालाजी कल्याणकर असे त्या शिवसैनिकांचे नाव....

तरोडा भागात तळमळीने काम करणाऱ्या बालाजी कल्याणकर यांनी दुसऱ्यांदा महापालिकेत प्रवेश मिळवला. ते एकमेव नगरसेवक ठरल्यामुळे सर्वजण त्यांना ‘एक ही टायगर’ ‘शिवसेनेचा एकच वाघ’ असे महापालिकेत म्हणू लागले. शिवसेनेच्या वतीने त्यांना बोलण्याची संधी सभागृहात मिळायची पण संख्याबळ कमी असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पण त्यांनी तो नेहमीच हाणून पाडला. महापालिकेत मागील वेळेस विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. इतर नगरसेवकांना भाषणबाजी येत होती त्यांच्यासारखी भाषणबाजी बालाजीरावांना येत नसली तरी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. सर्वसामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवत जनसंपर्क वाढवला आणि कामांना प्राधान्य दिले.

सर्वसामान्यांची कामे असतो की लोकहिताची असोत त्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या बालाजीरावांना हळूहळू आमदारीकीचे वेध लागले. तिकिट मिळेल की नाही, हा विचार त्यांनी केला नाही पण प्रयत्न सुरु ठेवले आणि सगळ्यांना मागे सारुन त्यांनी बाजी मारली आणि तिकिट मिळवले. सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणुक नंतर बदलत गेली आणि बालाजीरावांचे ‘कल्याण’ झाले आणि ते आमदार झाले. केवळ १८ दिवसात त्यांनी यश मिळवून दाखवले. आता आमदार झालेले कल्याणकर महापालिकेत कधी येणार? अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. 

मागील २००९ च्या निवडणुकीत नांदेड दक्षिणमधून ओमप्रकाश पोकर्णा आमदार झाले होते. त्यावेळी ते महापालिकेचे नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे आता आमदार कल्याणकर यांना देखील राजीनामा देण्याची गरज भासणार नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. महापालिकेच्या नियमात अशी कुठे तरतूद आहे का? याबाबतची माहितीही घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आमदार कल्याणकर यांच्या समर्थकांनी देखील शिवसेनेचा पिंडच मुळी समाजसेवा करण्याचा असून दोन्हीकडे कामच करावयाचे असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Nanded Manpat see the 'Ha' tiger?