तीन राज्यात भाजपला विरोध करणार : शिवलिंग शिवाचार्य महाराज

हरी तुगावकर
रविवार, 29 एप्रिल 2018

भाजप याच भूमिकेवर ठाम राहिला तर कर्नाटक,
महाराष्ट्र व अांध्रप्रदेशात लिंगायत समाजाला विरोध करून तेथे त्यांची सत्ता येऊ दिली जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी रविवारी (ता. २९) येथे पत्रकार परिषदेत केली.

लातूर : कर्नाटक सरकारने लिंगायत धर्माची केंद्र शासनाकडे शिफारस केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म देणार नाही, अशी घोषणा केली. भाजप याच भूमिकेवर ठाम राहिला तर कर्नाटक,
महाराष्ट्र व अांध्रप्रदेशात लिंगायत समाजाला विरोध करून तेथे त्यांची सत्ता येऊ दिली जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी रविवारी (ता. २९) येथे पत्रकार परिषदेत केली.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणी करीता आमचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु आहे. महामोर्चाना मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र,
कर्नाटक, तेलंगाना, तामिळनाडू, केरळ व आंध्रप्रदेश या सहा राज्यातील सर्व लिंगायत संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन सुरु केले आहे. हिंदू हा धर्म नाही. ते राष्ट्र आहे. देशात नसलेल्या ख्रिश्चनांना धर्माचा दर्जा दिला गेला. आम्ही तर मूळ निवासी आहोत. आमच्या समितीतही फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमची केंद्रशासनाकडे मागणी आहे. त्यात राजकीय पक्षांनी येऊच नये, असे ते म्हणाले.

कर्नाटक सरकारने केलेली शिफारसही राजकीय हेतूने प्रेरीतच आहे. पण त्यांना विरोध म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देणार नाही, असे घोषित केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्याची घोषणा केली. यातून आमच्या मागणीला भाजपचा विरोध दिसत आहे.

हा विरोध कायम राहिला तर कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या तीन राज्यात लिंगायत समाज भाजपाला विरोध करून त्यांची सत्ताच येऊ देणार नाही, अशी माहिती डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे चन्नबसवानंद स्वामी उपस्थित होते.
 

Web Title: will oppose to BJP in three states says Shivacharya Maharaj