बेंगरुळूच्या जैन विद्यापीठाला विजेतेपद

विजेत्या जैन विद्यापीठ बेंगलोर संघाला करंडक प्रदान करण्यात आले.
विजेत्या जैन विद्यापीठ बेंगलोर संघाला करंडक प्रदान करण्यात आले.

परभणी : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी (ता.नऊ) रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या लढतीत बेंगरुळू येथील जैन विद्यापीठाने चित्तथरारक लढतीत चंदिगडच्या पंजाब विद्यापीठ संघावर तीन विरुध्द दोन डावांनी मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिल्ली विद्यापीठ तिसऱ्या तर एसआरएम विद्यापीठ चेन्नईने चौथे स्थान प्राप्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व येथील (कै.) सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने आयोजीत पुरुष गटाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेचा गुरुवारी (ता.नऊ) समारोप झाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नांदेड विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, संस्थेचे सचिव विजय जामकर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना करंडक प्रदान करून झाले. या वेळी प्राचार्य डॉ. वसंत भोसले, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव रविंद्र पतंगे, डॉ. महेश वाकरटकर, डॉ. अभिजीत सरनाईक, प्रा. डॉ. के. के. पाटील, प्रा. डॉ. माधव कदम, प्रा. डॉ. संतोष कोकीळ, प्रा.डॉ. हेमंत शिंदे, प्रा. डॉ. राजेश्वर देशमुख, प्रा.डॉ. मदन ठाकुर, पांडूरंग कोकड आदींची उपस्थिती होती.


बेंगरुळू - पंजाब विद्यापीठात अंतिम सामना
स्पर्धेचा अंतिम सामना जैन विद्यापीठ बेंगलोर व पंजाब विद्यापीठ चंदीगड यांच्यात झाला. पहिल्या एकेरीच्या लढतीत पंजाबच्या कार्तिक जिंदालने बेंगरुळूच्या डॅनिएल एस फरीत याच्यावर २१-११, २३-२१ अशी सरळ मात करून पंजाबला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात बेंगलोरच्या एम.रोहित याने पंजाबच्या अभिषेक सैनीला जोरदार टक्कर देत २३-२१, १२-२१, २१-१९ अशी मात करून विद्यापीठाला बरोबरी साधून दिली. तर पहिल्या दुहेरीच्या लढतीत पंजाबच्या हार्दिक मक्कर व कार्तिक जिंदाल या जोडीने बेंगलोरच्या विद्यापीठाच्या गणेश व सैफ अली यांच्यावर २१-०१, २१-११ अशी मात करीत पंजाबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या एकीरेच्या लढतीत पुन्हा जैन विद्यापीठाच्या निखील श्रीराम याने पंजाबच्या हार्दीक मक्कार याच्यावर अटीतटीच्या सामन्यात २१-१३, १७-२१, २१-११ अशी सनसनाटी मात करून विद्यापीठाला २-२ अशा बरोबरीत आणले. पाचव्या दुहेरीचा सामना निर्णायक ठरला. यामध्ये जैन विद्यापीठाच्या डॅनिएल एस फरीद व साईप्रतिक यांच्या जोडीने पंजाबच्या अभिषेक सैनी व तलविंदरवर सरळ दोन सेटमध्ये २१-१७ व २१-१६ अशी मात करीत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरडे. शेवटचा सामना जिंकल्यानंतर जैन विद्यापीठाच्या खेळाडूंसह प्रशिक्षांनी कोर्टवर एकच जल्लोष केला. 

चेन्नई चौथ्या स्थानावर 
तत्पुर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत दिल्ली विद्यापीठाने एसआरएम विद्यापीठ चेन्नईचा तीन विरुध्द शुन्य डावाने पराभव करीत तिसरे स्थान प्राप्त केले तर चेन्नई चौथ्या स्थानावर राहिला. या लढतीत दिल्लीच्या राहुल पटेल याने चेन्नईच्या मनीगंडम याच्यावर २१-१७, २१-१२, ध्रुव रावत याने मुकूल अरोरा याच्यावर २१-१४, २१-११ अशी तर दुहेरीत दिल्लीच्या निखील मेहलावत व ध्रुव रावत यांच्या जोडीने अर्जुन कृष्णन व सेंथीलवेल या जोडीवर २३-१२, २१-१८ अशी मात केली. 
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com