
दिवसेंदिवस बिकट होत असलेल्या उदगीरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हाती घेतला आहे. एक महिन्यात उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लावणार असल्याची घोषणा निखिल पिंगळे यांनी गुरुवारी (ता.२४) आयोजित पत्रकार परिषदेत केली.
उदगीर (जि.लातूर) : दिवसेंदिवस बिकट होत असलेल्या उदगीरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हाती घेतला आहे. एक महिन्यात उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लावणार असल्याची घोषणा निखिल पिंगळे यांनी गुरुवारी (ता.२४) आयोजित पत्रकार परिषदेत केली. शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.कोल्हे, शहर पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. उदगीरच्या वाहतूक कोंडीच्या विषयावर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड
श्री.पिंगळे म्हणाले, उदगीरची वाहतूक कोंडी होते कशी? याचा अभ्यास करण्यात आला असून त्या आधारावर शहराचा २४ जानेवारीपर्यंत सर्वे करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने एक महिन्यात नवीन बदल करण्यात येणार आहेत. त्यातील उणीवा तपासून मग कायमची वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उदगीर शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असून शहरातील नांदेड बिदर प्रमुख रस्ता अतिक्रमणे व हातगाडी बेशिस्त पार्किंगच्या कचाट्यात सापडल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
त्यामुळे काही रस्ते वनवे करावे लागणार आहेत. काही ठिकाणी नो पार्किंग करावी लागणार आहे. शहरातील रिक्षा प्रमाणित करणार असून रात्रपाळी दिवसपाळी असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यांना शहरातील ठराविक रस्त्यावर थांबे देण्यात येणार आहेत. वाहतुकीची सुविधा निर्माण व्हायची असेल तर नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, तरच ते शक्य होणार असल्याचेही श्री.पिंगळे यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गजानन पाटील, श्री.एडके, सहदेव खेडकर आदी उपस्थित होते.
नगरपालिका, बांधकाम व विद्युत मंडळ सकारात्मक
शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची निर्णायक भूमिका आहे. त्यांच्या समवेत बैठक पार पडली आहे. हे तिन्ही विभाग या वाहतूक कोंडीच्या प्रश्नासाठी सकारात्मक आहेत. यांना सोबत घेऊन पोलीस विभागाच्या पुढाकाराने शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी दिले आहे.
संपादन - गणेश पिटेकर