शहरात धावताहेत विनाक्रमांकांचे टॅंकर

अनिल जमधडे
सोमवार, 1 एप्रिल 2019

पोलिस, आरटीओचा नाकर्तेपणा
शहरात धोकादायक पद्धतीने पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. या विरोधात वाहतूक पोलिस किंवा आरटीओने कारवाई करणे आवश्‍यक आहे. आरटीओ कार्यालयांत भरारी पथके आहेत; मात्र या पथकांना असे राजरोसपणे सुरू असलेले टॅंकर दिसत नाहीत ही गंभीर बाब आहे. पोलिस आणि आरटीओ अशा दोन्ही यंत्रणा डोळेझाक करत असल्याने, शहरातील प्रत्येक चौकातून नागरिकांना धोका निर्माण करणारे हे टॅंकर धावत आहेत.

औरंगाबाद - शहरात सर्रास भंगार व विनाक्रमांक धोकादायक टॅंकरच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या टॅंकरच्या निमित्ताने फिटसनेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

शहरात सध्या चार ते सहा दिवसांआड पाणी येत आहे. सध्या भीषण उन्हाळा जाणवत असल्याने पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अनेक वसाहतींना नळयोजनाच नसल्याने त्यांना पाण्याच्या टॅंकरवर तहान भागवावी लागत आहे. पाण्याची मागणी वाढल्याने, सध्या शहरात टॅंकरचा व्यवसाय जोरात सुरू आहे. पाणी विक्री करणारे व्यावसायिक आणि महापालिकेचा पाणीपुरवठा करणारे ठेकेदार यांच्याकडून सर्रास बेकायदा पद्धतीने पाण्याची वाहतूक केली जात आहे. पोलिसांच्या साक्षीने राजरोसपणे जुनाट झालेले भंगार टॅंकर, विनाक्रमांकाचे टॅंकर रस्त्यावर चालवले जात आहेत. याशिवाय टॅंकरला जोडलेल्या विनाक्रमांकाचे टॅंकरही बिनदिक्कतपणे सुरू आहेत. शहरात महापालिकेचे बहुतांश टॅंकर हे ट्रॅक्‍टरला जोडलेले आहेत.

वळण घेताना हे चालक अचानकपणे वेगात वळण घेतात, त्यामुळे अन्य वाहनांना आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. टॅंकरला क्रमांक, रिफ्लेक्‍टर, ब्रेक लॅम्प, स्टॉपगार्ड बसवणे आवश्‍यक आहे. मात्र यातील एकाही बाबीची पूर्तता केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

काय आहे नियम 
पाणी वाहतुकीचे टॅंकर हे आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. अशा वाहनाची आरटीओ निरीक्षक तपासणी करून वाहन योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला फिटनेस प्रमाणपत्र देतात.

फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन चालवता येत नाही. अशा वाहनांना प्रत्येक वर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे. ट्रॅक्‍टरला जोडलेले पाण्याचे टॅंकर हे ट्रॉली या संवर्गात येते. त्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून रीतसर नोंदणी करून क्रमांक घेणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरात ट्रॅक्‍टरला जोडलेले विनाक्रमांकांचे टॅंकर सर्रास नोंदणी न करता चालवले जात आहेत.

 

Web Title: without number Water Tanker Water Supply Transport RTO