बसमध्ये चढताना धक्का लागून पडल्याने महिला भाविक ठार   

बालाजी कोंडे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

श्री दत्तशिखर मंदीर बसस्थानकावर बसमध्ये चढताना भाविकांचा धक्का लागल्याने पस्तीस वर्षीय महिला भाविक पडल्याने गंभीर जखमी झाली. प्राथमिक उपचार शासकिय ग्रामीण रुणालयात करून पुढील उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले होते.

माहूर - माहूर गडावर शनिवारी परिक्रमा यात्रा सुरू झाली. यात्रेकरिता लाखो भाविक गडावर दाखल झाले आहेत. रविवारी (ता. 26) सकाळी साडेआठ ते नऊ वाजताचे सुमारास श्री दत्तशिखर मंदीर बसस्थानकावर बसमध्ये चढताना भाविकांचा धक्का लागल्याने पस्तीस वर्षीय महिला भाविक पडल्याने गंभीर जखमी झाली. प्राथमिक उपचार शासकिय ग्रामीण रुणालयात करून पुढील उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

माहुर गडावर नारळी पौर्णिमेच्या परिक्रमा यात्रेकरिता वाडी मुक्ताजी ता. मुदखेड येथील ज्ञानोबा इंगोले परिवारासह दर्शनाकरिता आले होते. दर्शन करुन गावाकडे परत जाण्याकरिता श्री दतशिखर मंदीर पायथ्याशी असलेल्या बसस्थानकावर आले. 

एस.टी. बस क्रमांक एम एच 20 बी एल 1267 मध्ये चढताना त्यांच्या पत्नीला मंगलाबाई ज्ञानोबा इंगोले (वय 35) यांना गर्दीचा धक्का लागला त्या बसवर आदळुन खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ माहूर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले होते.

मंगलाबाई इंगोले यांच्या पायाला बसचा पत्रा लागल्याने तिस टाके पडले आहेत, कमरेला व मनक्याला जबर मार लागला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्हि. एन. भोसले यांनी दिली आहे.                           
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी आसाराम जहारवाल, पोलिस निरिक्षक लक्ष्मण राख, राज्य परिवहन महामंडळाचे माहूर आगार प्रमुख  व्हि. टि. धुतमल, पी. डि. देशमुख, एस.सी. कातरे, डि. एस. कोकणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिला भाविकाची भेट घेऊन चौकशी केली होती. दरम्यान नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी दोन वाजता मंगलाबाई इंगोले यांचा मृत्यु झाला, अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. व्हि. एन. भोसले यांनी दिली.             

राज्य परिवहन महामंडळाकडून तत्काळ एक हजार रूपयाची मदत देण्यात आली आहे अशी माहिती आगारप्रमुख व्हि. टि. धुतमल यांनी दिली असून महिलेचा मृत्यु झाल्याची माहीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे धुतमल यांनी सांगितले.             

माहूर टि पॉईंट येथून श्री दत्तशिखर मंदिराकडे जात असताना रविवारी (ता. 26) सकाळी साडेदहा वाजता अज्ञात व्यक्तीने एस.टि.बस (क्रमांक एमएच 40 -9177) वर दगडफेकून वाहकाकडिल काच फोडली. यात दोन हजार रुपयाचे नुकसान झाले आहे अशी तक्रार चालक अमोल गिरी यांनी माहूर पोलिस स्टेशनला दिली आहे.                 

Web Title: A woman devotee killed while move in the bus