महिलेने रस्त्यातच दिला गोंडस कन्येला जन्म, कोठे? ते वाचाच

राजेश दारव्हेकर
Friday, 1 May 2020

आखाड्यावरील सर्व महिला ज्योतीच्या मदतीसाठी क्षणात धावून आल्या. या महिलांनी ज्योतीची सुरक्षित प्रसुतीसाठी मदत केल्याने तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन आई दोघेही सुखरूप आहेत. 

हिंगोली :  लॉकडाउनमुळे सर्वप्रकारची वाहतुक बंद असल्याने नागरिकांची प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी, एक गरोदर महिला दुचाकीवरून घराकडे जात असता, रस्त्यातच गोंडस कन्येला जन्म दिला आहे. 

जालना येथून कळमनुरीकडे दुचाकीने जाणाऱ्या एका मजुर महिलेची हिंगोली जिल्ह्यातील जलालढाबा येथे रस्त्यावरच प्रसूती झाली. तिची अवस्था बघून आजूबाजूच्या महिला तिच्या मदतीसाठी तत्काळ धावून येवून सुरक्षित प्रसुती करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन् माता सुखरूप आहे. दरम्यान ही माहिती पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांना कळताच त्यांनी पत्नीसह खाजगी गाडी घेऊन त्या महिलेजवळ धाव घेऊन तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.

हेही वाचा - ‘या’ जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याविना ध्वजवंदन

ज्योती शेळके असे प्रसूत झालेल्या महिलेच नाव आहे. ती आपल्या नातेवाईकांसह जालना जिल्ह्यात कामानिमित्त गेली होती. दरम्यान कोरोनाला हरवण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे ज्योतीसह सर्व मजूर जालन्यातच अडकून पडले होते. मात्र अडकलेल्यांना गावी जाण्यासाठी शिथिलता दिल्यामुळे हे सर्वजण आपापल्या गावी निघाले. अडकलेले २० ते २५मजुर एका टेम्पोतुन कळमनुरीकडे रवाना झाले. तर ज्योती ही आपल्या मामाच्या मुलासोबत दुचाकीवर गावाकडे निघाली होती. परंतु, जागोजागी पोलिसांचा पहारा असल्यामुळे भीत-भीतच त्यांची नजर चुकवून दोघांनीही मार्ग काढला. 

जालन्याहून ज्योती ही ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी मार्गे मामाच्या मुलासोबत जात होती. दरम्यान त्यांची गाडी जलालधाब्याजवळ पोहोचताच ज्योतीला प्रसूतीच्या वेदना जाणवायला लागल्या. त्यामुळे दोघेही घाबरून जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. दोघेही बैचेन अवस्थेत होते. मात्र, मामाच्या मुलाने रस्त्याच्या कडेला असलेल्या आखाड्यावरील महिलांना मदतीसाठी हाक दिली. मागचा पुढचा विचार न करता आखाड्यावरील सर्व महिला ज्योतीच्या मदतीसाठी क्षणात धावून आल्या. या महिलांनी ज्योतीची सुरक्षित प्रसुतीसाठी मदत केल्याने तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन आई दोघेही सुखरूप आहेत. 

हे देखील वाचलेच पाहिजे - धक्कादायक :  नांदेडमध्ये बाधीतांची संख्या गेली सहावर,  दोघांचा मृत्यू

ही बाब पिंपळदरी येथील समाजसेवक बापूराव घोंगडे यांना समजली.  त्यांनी आपल्या पत्नीसह आवश्यक ती मदत घेऊन खाजगी गाडीसह ज्योतीकडे धाव घेतली. त्यांनी ज्योतीला तातडीने पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नंतर पाठीमागून टेम्पोत बसून आलेल्या इतरही मजुरांनी ज्योतीवर ज्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत तिथे धाव घेतली. बाळ अन आई दोघे ठणठणीत असल्याचे पाहून, ते सर्वजण मार्गस्थ झाले. लॉकडाऊनमुळे वाहतुक व्यवस्था बंद असल्याने अनेकांची मोठी दैना सुरू आहे. सुदैवाने ज्योतीला वेळेवर मदत मिळाल्याने सुरक्षित प्रसुती होऊ शकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman gave birth to a cute girl on the street Hingoli News