औरंगाबाद : अपघातात महिला ठार, पती जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मोपेडस्वार महिलेने अचानक ब्रेक मारल्याने अन्य एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. यात दुचाकीवरून पडलेल्या महिलेस एसटी महामंडळाच्या बसने चिरडले. हा अपघात सोमवारी (ता. पाच) सकाळी पावणेअकराच्या सुमारास हर्सूल रस्त्यावर घडला. लताबाई नवनाथ खिल्लारे (वय 24, रा. खिल्लारे टाकळी, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. 

औरंगाबाद - मोपेडस्वार महिलेने अचानक ब्रेक मारल्याने अन्य एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. यात दुचाकीवरून पडलेल्या महिलेस एसटी महामंडळाच्या बसने चिरडले. हा अपघात सोमवारी (ता. पाच) सकाळी पावणेअकराच्या सुमारास हर्सूल रस्त्यावर घडला. लताबाई नवनाथ खिल्लारे (वय 24, रा. खिल्लारे टाकळी, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लताबाई शहरातील एक रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना सोमवारी डॉक्‍टरांनी वेळ दिली होती. त्यामुळे लताबाई व त्यांचे पती नवनाथ खिल्लारे सकाळीच दुचाकीने (एमएच-21, बीबी-5865) गावाकडून औरंगाबादकडे येत होते. दोघे सकाळी पावणेअकरा वाजता हर्सूल रस्त्यावरील समृद्धी लॉन समोरून जात असताना अचानक मोपेडवर जाणाऱ्या एका महिलेने ब्रेक मारले. त्यामुळे खिल्लारे यांचे दुुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. नवनाथ हे दुचाकीसह बाजूला पडले, तर लताबाई रस्त्यावर पडल्या.

यावेळी सिल्लोडकडे जाणाऱ्या एसटी बसच्या (एमएच-40, एन-5763) मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाल्या; तर नवनाथ किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने लताबाईला घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना पावणेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman killed, husband injured in accident at Aurangabad