आधी पत्नीचा खुन केला मग घराला कुलुप लावून गेला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

वादामुळे आरती शुक्रवारी फुलेनगर येथे तिच्या माहेरी गेली. परंतु, राहुलने समजुत घालुन तिला शनीवारी (ता. आठ) रामनगर येथील घरी नेले. परंतु मनात राग होताच. यातुन त्याने तिचा गळा आवळुन खून केला. त्यानंतर मृतदेह पलंगखाली टाकून तो घरातुन बाहेर आला. दरवाजाला कुलूप लावून त्याने पोबारा केला.

औरंगाबाद - सततची कुरबुर व वाद घालणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून निर्घुन खून केला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पसार झाला. ही घटना मुकुंदवाडीतील रामनगर येथे रविवारी (ता. आठ) दुपारी उघडकीस आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरती राहुल गवळे (वय 19) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती राहुल दिनकर गवळे (वय 26, मुळ रा. लिंगदरी, जि. औरंगाबाद, ह. मु. रामनगर, मुकुंदवाडी) याच्यावर खुनाचा संशय पोलिसांना आहे. राहुल हा लिफ्ट मेकॅनिक आहे. खुन प्रकरणी आरतीचे वडील बाबासाहेब मोहन मस्के (वय 40, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) यांनी तक्रार दिली.

त्यानुसार, आरती हिचा तीन वर्षांपूर्वी राहुल गवळेसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर ते नवी मुंबई येथे राहत होते. राहुल मुंबईत लिफ्ट मेकॅनिक म्हणून काम करीत होता. परंतु घरात दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. राहुलने वाळूज महानगरातील बजाजनगरमध्ये फ्लॅट खरेदी केला परंतु तेथे त्याची बहीण राहत असुन फ्लॅटचा हप्ता राहुलच्या खात्यातून कपात होत असल्याचे लक्षात आल्याने यावरुनही त्यांच्यात वाद झाले. दरम्यान औरंगाबादेतील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आरतीचा आग्रह होता. त्यामुळे राहुल औरंगाबादेत राहण्यासाठी आला परंतु फ्लॅटमध्ये राहण्याऐवजी रामनगर येथे किरायाने राहु लागला. अशा काही कारणांमुळे दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. 

त्या दिवशी काय झाले? 
वादामुळे आरती शुक्रवारी फुलेनगर येथे तिच्या माहेरी गेली. परंतु, राहुलने समजुत घालुन तिला शनीवारी (ता. आठ) रामनगर येथील घरी नेले. परंतु मनात राग होताच. यातुन त्याने तिचा गळा आवळुन खून केला. त्यानंतर मृतदेह पलंगखाली टाकून तो घरातुन बाहेर आला. दरवाजाला कुलूप लावून त्याने पोबारा केला. अशी पोलिसांनी माहिती दिली. 

शेजाऱ्यांच्या संशयावरुन घटना उघड 
काही दिवसांपुर्वीच राहण्यासाठी आलेल्या आरतीला शेजारील महिला चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. नेहमी दुपारी गल्लीतील महिलांशी ती चर्चा करीत होती. परंतु रविवारी दुपारी ती न दिसल्याने त्यातील एकीने राहुलला फोन करून आरतीबाबत विचारणा केली. ती घरीच असल्याचे सांगून त्याने कॉल कट केला. सायंकाळपर्यंत ती न दिसल्याने स्थानिकांनी काळजीपोटी पोलिसांना कळविले. त्यानंतर मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव जाधव, उपनिरीक्षक डी. बी. कोपनर, राहुल बांगर यांचे पथक घटनास्थळी गेले. त्यांनी घर उघडल्यानंतर आरतीचा खुन झाल्याचे आढळले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman murdered in aurangabad