नऊ महिन्यांनी ‘तिला’ मिळाले आपले घर!

प्रल्हाद कांबळे
रविवार, 13 जानेवारी 2019

नांदेड - नऊ महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या बिहारमधील एका ४६ वर्षीय महिलेवर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर या महिलेला आपला परिवार मिळाला. हरविलेल्या पत्नीला पाहून तिच्या पतीने व मुलाने हंबरडा फोडला. या क्षणाने पोलिसांचेही डोळे पाणावले होते. 

नांदेड - नऊ महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या व मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या बिहारमधील एका ४६ वर्षीय महिलेवर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर या महिलेला आपला परिवार मिळाला. हरविलेल्या पत्नीला पाहून तिच्या पतीने व मुलाने हंबरडा फोडला. या क्षणाने पोलिसांचेही डोळे पाणावले होते. 

मूळची बिहारमधील ताजपूर (जि. मोतिहारी) येथील मानसिक आजाराने त्रस्त असलेली महिला बनारशीदेवी पतीसोबत उपचारासाठी मेहशी येथील रुग्णालयात जात होती; मात्र पाटणा रेल्वेस्थानकावर ती कुटुंबीयांपासून गर्दीत हरवली. पुढे अनेक दिवस तिचा नातेवाइकांनी शोध घेतला; परंतु ती सापडली नाही. इकडे बनारशीदेवीने पाटणा रेल्वेने थेट नांदेड गाठले. तिच्या पायाला गंभीर जखम होती.

लोहमार्ग पोलिसांनी बनारशीदेवीला शासकीय रुग्णालयात २८ मार्च २०१८ ला दाखल केले. तेथील मानसिक रोग कक्षात तब्बल आठ महिने तिच्यावर डॉ. प्रदीप बोडखे, डॉ. यू. बी. आत्राम, नर्स कुंभलकर, ब्रदर्स श्री. वाघ यांनी तिची काळजी घेतली. वेळोवेळी लोहमार्ग पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे तिच्याबद्दल माहिती घेत होते. उपचारानंतर तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू झाला. या वेळी बिहारी रेल्वे कर्मचारी सौरभकुमार यांनी तिचा फोटो व माहिती भोजपुरी भाषेत मोतिहारी जिल्ह्यातील मित्रांच्या एका व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकली. ही पोस्ट एवढी व्हायरल झाली, की ती बनारशीदेवी यांच्या बिहारमधील गावात पोचली. गावातील मदन शहा यांनी तिचे पती दीपनारायण राय यादव यांना आर्थिक मदत करून नांदेडला पाठविले.

नांदेडमध्ये पत्नीला पाहून पती व नातेवाइकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. निरीक्षक श्री. जाधव यांनी सहकाऱ्यांकडून मदत जमा करून या परिवाराला दिली व रवाना केले. रेल्वे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, उपअधीक्षक संजय सातव यांनी या कामगिरीबद्दल लोहमार्ग पोलिसांचे कौतुक केले. यासाठी एपीआय स्वप्नाली धुतराज, फौजदार हाश्‍मी, उत्तम कांबळे, जीवराज लव्हाळे, सादिक बाबा, सुरेश महाजन, श्री. निकाळजे यांनी परिश्रम घेतले. या घटनेवरून ‘खाकी वर्दी’तील माणुसकीचा प्रत्यय आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Woman Returned in family after nine months