बचतगटाच्या महिलांची मत्स्यव्यवसायात भरारी

Nanded News
Nanded News

नांदेड : बचतगटाच्या माध्यमातुन फुलशेती यशस्वी केल्यानंतर महिलांनी शेतीपुरक व्यवसायाला उद्योगाची जोड देण्याचा निर्णय घेतला. बघता-बघता या महिलांनी मत्स्यव्यवसायातही भरारी घेतली. नाळेश्वर (ता. नांदेड) येथील जयदुर्गा बचतगटाच्या महिलांनी कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून मिळालेल्या शेततळ्यात साडेसहा हजार मत्स्यबीजाचे संगोपण केले जात आहे. यासाठी बॅंकेडून पावणे चार लाखांचे कर्ज त्यांना प्राप्त झाले.

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून सावित्री महिला लोकसंचालित साधन केंद्राद्वारे नांदेड तालुक्यातील १९ गावात बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या गटांना बँकेमार्फत वित्तीय पुरवठा करुन त्यांचे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येते. या गावातील महिलांनी पारंपारिक उद्योग व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काहीतरी नावीन्यपूर्ण उद्योग करून त्याच्यातून पैसे मिळवावेत अशी इच्छा व्यक्त केली. याच गावातील जयदुर्गा व महालक्ष्मी महिला बचत गटातील महिलांनी फुलशेतीचा निर्धार केला. फूलशेती व्यवसायात १५ महिला काम करीत आहे. स्वतःची जमीन असल्याने महिलांनी एक एकर, तीस गुंठे तर काही महिलांनी दिड एकरमध्ये फुलशेती चालू आहे. फुलांची तोडणी झाल्यानंतर शहरातील हिंगोली गेट मार्केटच्या ठिकाणी फुलांची विक्री करण्यात येते. यामधून त्यांना मजुरी वगळता चांगले पैसे मिळत असल्याने महिला समाधान व्यक्त करत आहेत. 

मत्स्यव्यवसायाची अशी झाली सुरुवात
फुलशेती व्यवसायामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याने फुलशेतीला उद्योगाची जोड द्यावी, यासाठी त्यांनी सर्वानुमते मत्स्यव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.  जयदुर्गा महिला बचत गटातील शांताबाई बाबुराव धोत्रे यांना कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे योजनेतून सामुहिक शेततळ्याचा लाभ मिळाला. जयदुर्गा महिला बचत गटाला फेब्रुवारीमध्ये तीन लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज बँकेकडून प्राप्त झाले. या कर्जाच्या माध्यमातून शेततळ्यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पाच लाख घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या शेततळ्यात दहा हजार मासेपालन करण्याचा निर्णय घेवून जालना येथील व्यापाऱ्यांकडून विविध जातीचे मत्स्यबीज खरेदी केले. यात राहू जातीचे दोन हजार १५० मत्स्यबीज, कतला जातीचे दोन हजार १५० मत्स्यबीज तर मर्गल जातीचे दोन हजार दोनशे मत्स्यबीज असे एकूण सहा हजार पाचशे मत्स्यबीज या शेततळ्यात ऑक्टोबरमध्ये सोडण्यात आले. या माशांची योग्य वाढ व सुरक्षितता करण्यासाठी कंपाऊंड, जाळी, खांब व खाद्य खरेदी करण्यात आले. सहा महिन्यात या माशांचे वजन एक किलोपर्यंत होइल, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन
नाळेश्वर येथील बचतगटांच्या महिलांनी ‘माविम’च्या अर्थसहायाने फुलशेती तसेच शुद्ध पाणी पुरवठ्याचा व्यवसाय सुरु केल्याची माहिती ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी चंदणसिंग राठोड यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ काढत नाळेश्वरला भेट देवून फुलशेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिलांच्या कष्टाचे कौतुक करुन कृषी विभागाच्या योजना प्राधान्याने देण्याचे जाहीर करून इतर व्यवसायासाठीही महिलांना प्रोत्साहन दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com