संवाद कार्यक्रमात "माऊली' कडाडल्या

माऊली संवाद कार्यक्रमात महिलेसोबत संवाद साधताना आदेश बांदेकर.
माऊली संवाद कार्यक्रमात महिलेसोबत संवाद साधताना आदेश बांदेकर.

औरंगाबाद: शहरातील रस्ते, पाणी, कचरा कुत्र्यांचा प्रश्‍न एवढा गंभीर बनला आहे की, शिवसेनेच्या "माऊली संवाद' कार्यक्रमात सर्वांचे लाडके "भाऊजी' व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना महिलांच्या प्रश्‍नाला तोंड देताना अक्षरशः नाकीनऊ आले. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची दखल थेट "मातोश्री'वरून घेतली जाईल, असे आश्‍वासन देत बांदेकर यांनी या प्रश्‍नांच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे आदेश बांदेकर यांच्या "माऊली संवाद' या कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी गारखेडा परिसरातील श्रीहरी पॅव्हेलियन येथे श्री. बांदेकर यांनी महिलांशी संवाद साधला. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी काम करीत आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसार मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे, असे सांगत त्यांनी महिलांना तुमचे प्रश्‍न काय? अशी विचारणा केली. त्यावर रस्ते, पाणी, कचरा, कुत्र्यांची वाढलेली संख्या अशा मूलभूत प्रश्‍नांचा भडिमार बांदेकर यांच्यावर महिलांनी केला. महापालिकेत 25 वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे आणि मेळावा शिवसेनेचा आहे, याचे भानही महिलांना रोजच्या अडचणींसमोर राहिले नव्हते. कुत्र्यांची एवढी दहशत आहे की, आमच्या मुलांना बाहेर पाठविण्यास भीती वाटते, असे एका महिलेने सांगितले. घरकुल योजनेत होणारा भेदभाव, शाळांचे वाढलेले डोनेशन, बेरोजगारी, एमआयडीसी बंद होणार का? यासह अनेक व्यक्तिगत प्रश्‍न महिलांनी उपस्थित केले. आमदार संजय शिरसाट यांना थेट सवाल करत महिलांनी आतातरी लक्ष द्या, असे आवाहन केले. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोनगावकर, युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांची उपस्थिती होती. 

मुलगा गेला त्या आईला 
काय वाटत असेल?
 
बजाजनगर येथील महिलांनी अनेक समस्या मांडल्या. मोकाट गाई, कुत्र्यांची समस्या मांडताना मीरा सुरासे म्हणाल्या, मोकाट गाईमुळे अपघात होऊन एका मुलाचा मृत्यू झाला. जिचा तरुण मुलगा गेला, आज त्या आईला काय वाट असेल, याचा विचार करून हा प्रश्‍न मार्गी लावा, अशी मागणी त्यांनी केली. 

लोक विचारतात, 
खैरेंनी काय केले? 

मध्य विधानसभा मतदारसंघ संघटक गोपाळ कुलकर्णी यांच्या पत्नी तथा विभागप्रमुख वंदना कुलकर्णी म्हणाल्या, की लोक विचारतात एवढ्या वर्षांत खैरे यांनी काय केले? त्यांनी खूप कामे केली मात्र ते जनतेपर्यंत गेली नाहीत. येणाऱ्या काळात रस्ते, पाणी, सफाई, ड्रेनेज या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

बुरखा घालून का आल्या? 
मुकुंदवाडी येथील शेख रिझवाना यांनी कार्यक्रमात येताना मला अनेकांनी बुरखा घालून जाता येणार नाही, असे म्हणत हटकले, अशी खंत बांदेकर यांच्याकडे व्यक्त केली. जात धर्म वेगळे ठेऊन विकास कामे झाली पाहिजे, असा सल्ला अनेकांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com