चिमुकल्याला दवाखान्यात नेताना आई ठार, मुलासह वडील जखमी  

आर. के. भराड
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

घराबाहेर खेळताना पायऱ्यांवरून पडून जखमी झालेल्या दीडवर्षीय मुलास दुचाकीवरून घाटी रुग्णालयात नेताना कंटेनरची धडक बसली. यात चिमुलक्‍याची आई ठार, तर वडिलांसह चिमुकला जखमी झाला. हा अपघात पंढरपूर येथील तिरंगा चौकात शनिवारी (ता. तीन) दुपारी दोनच्या सुमारास झाला. 

वाळूज (जि. औरंगाबाद) - घराबाहेर खेळताना पायऱ्यांवरून पडून जखमी झालेल्या दीडवर्षीय मुलास दुचाकीवरून घाटी रुग्णालयात नेताना कंटेनरची धडक बसली. यात चिमुलक्‍याची आई ठार, तर वडिलांसह चिमुकला जखमी झाला. हा अपघात पंढरपूर येथील तिरंगा चौकात शनिवारी (ता. तीन) दुपारी दोनच्या सुमारास झाला. 

वाळूज परिसरातील वळदगाव येथील प्रकाश पोचीराम सोनटक्के (मूळ रा. रामखडक, ता. उमरी, जि. नांदेड) यांचा दीड वर्षाचा मुलगा शुभम हा घराबाहेर खेळत असताना पायऱ्यांवरून पडल्याने जखमी झाला. त्यामुळे सोनटक्के हे दुचाकीवरून (एमएच- 20, डीयू- 1780) पत्नी रेखासह शुभमला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घाटीत नेत होते. दरम्यान, भरधाव जाणाऱ्या कंटेनरची (एमएच- 04, एचवाय- 5276) त्यांच्या दुचाकीला पंढरपूर येथील तिरंगा चौकात धडक बसली. यात पाठीमागे बसलेल्या रेखा कंटेनरच्या चाकाखाली आल्याने ठार झाल्या; तर दीड वर्षाचा शुभम आणि त्याचे वडील प्रकाश जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. 
  
चालक फरारी 
हा अपघात घडताच कंटेनरच्या चालकाने गर्दीचा फायदा घेऊन पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार, पोलिस कॉन्स्टेबल डी. एल. ऋषी, एन. के. साळवे आदींनी धाव घेतली. 108 रुग्णवाहिकेचे अमोल कोलते व पायलट राजू रोकडे यांनी जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघातप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बांगर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women killed in accident at Waluj Pandharpur