हिरेमठ हल्लाप्रकरणी महिला पोलिसाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लातूर - साखरा पाटीजवळील हिरेमठ पेट्रोलपंपावर पेट्रोलपंपाचे मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात सहभागाच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिला पोलिसाला अटक केली. तिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही महिला पोलिस निलंगा येथे कार्यरत आहे.

साखरा पाटीजवळ असलेल्या हिरेमठ यांच्या पेट्रोलपंपावर जानेवारी २०१७ मध्ये रात्रीच्यावेळी काही व्यक्तींनी हल्ला केला होता. यात श्रीकांत हिरेमठ यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला होता. यात ते जखमी झाले होते. या घटनेत चोरट्यांनी ७० हजार रुपये, सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, सोन्यात गुंफलेली रुद्राक्षाची माळ चोरट्यांनी नेली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तातडीने प्रभू लखादिवे, प्रदीप वोगले व सचिन कावळे या तिघांना अटक केली होती. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणात एका महिला पोलिसाचा हात असल्याचा संशय पोलिसांना सुरवातीपासूनच होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरूच ठेवला होता. या घटनेत आरोपींनी वापरलेली पिस्तूल ही मध्य प्रदेशातून आणलेली होती. ही पिस्तूल आणण्यासाठी ही महिला पोलिस आरोपीसोबत गेल्याचा संशय पोलिसांना आहे. यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्षाराणी चव्हाण हिला अटक केली आहे. तिला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Women police arrested