महिलांची निदर्शने, धरणे, थाळीनाद अन्‌ तिरडी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

दारूबंदीसाठी मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

दारूबंदीसाठी मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

बीड - ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात दारू विक्रीचे प्रमाणही मोठे आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत असताना प्रशासन दारूबंदीसाठी फारसे प्रयत्न करीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी (ता. आठ) जागतिक महिलादिनी दामिनी अभियानाच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी तिरडी मोर्चा काढला. या वेळी महिलांनी दारूचा निषेध म्हणून गळ्याभोवती दारूच्या बाटल्यांचा हार अडकवीत दारूमुळे होणाऱ्या मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. 

संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करावी, मार्चअखेर जिल्ह्यातील सर्व परवानाधारक दुकाने, महामार्गावरील दुकाने तत्काळ बंद करावेत, दारूबंदी मंडळे स्थापन करावीत, ग्रामसंरक्षक दल स्थापन करावे, हातभट्टी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करावी, महिला हिंसाचारात दारूच्या त्रासाचा उल्लेख करावा, दारूमुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी जाहीर करावी, कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, स्पिरीटचा वापर हातभट्टीतील दारूत होत असल्यास त्यावर निर्बंध घालावेत, एकल महिलांचे संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढविण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दामिनी अभियानातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी १ वाजता निघालेला तिरडी मोर्चा सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे पुतळा, जालना रोड, शिवाजी पुतळा, नगर रोडमार्गे दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी महिलांनी दारूबंदीबाबत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी काही महिलांनी दारूचा निषेध म्हणून गळ्याभोवती दारूच्या बाटल्यांचा हार अडकवीत दारूमुळे होणाऱ्या मृत्यूची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढली. 

या वेळी मोर्चात सत्यभामा सौंदरमल, द्वारका कांबळे, अशोक पालके, कबिरदास कांबळे, कांता इचके, आशा मडके, धनंजय घोळवे, अकीन शेख, राम शेळके, रवी मोरे, अश्‍लेषा सौंदरमल, काजल पंडागळे, योगेश जाधव, मुक्ता अडागळे, आशा आडागळे, रेखा भाकरे, मनकर्णा पाटोळे, संजीवनी माने, सीता गायकवाड, सुमन सौंदरमल, लक्ष्मी मोरे, सागर भाकरे, गंगूबाई खडके, सविता पवार, नंदा थोरात, कस्तुराबाई खंडागळे, शहाबाई ससाणे आदी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 
 

परळी, माजलगावच्या सफाई कामगारांचा वेतनप्रश्‍न ऐरणीवर 

बीड - नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे, सफाई कामगारांना सेवेत नियमित करावे, किमान वेतन दराने देय असलेले वेतन आणि प्रत्यक्ष देण्यात आलेले वेतन यातील फरक द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी रोजंदारी मजदूर सेनेचे राज्य सचिव गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव व परळी नगरपालिकेतील सफाई कामगार महिलांनी मंगळवारपासून (ता. सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने व थाळीनाद आंदोलन सुरू केले आहे.

कंत्राटी कामगारांना माजलगाव व परळी नगरपालिकांनी  नोकरीत कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांइतकेच म्हणजे समान कामासाठी समान वेतन द्यावे, सफाई कामगारांना सेवेत नियमित करावे, प्रत्यक्ष दिलेले वेतन व शासनाने निर्धारीत केलेले वेतन यातील फरक मिळावा, अतिरिक्त कामाचा मोबदला रोखीने मिळावा, ब्रिक्‍स फॅसिलिटीज आणि नागनाथ एंटरप्रायझेस परळी यांच्याकडील कामगारांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्वरित मिळावी, सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र.२१३ चे २०१३ च्या निकालपत्रानुसार कंत्राटी कामगारांना समान कामास समान पान २ वर 
परळी, माजलगावच्या सफाई कामगारांचा वेतनप्रश्‍न ऐरणीवर वेतन देऊन नियमित करावे, विश्रांतीच्या दिवसाचे पारिश्रमिक द्यावे, अतिकालिक दराचे वेतन देऊन बोनस द्यावा, नागनाथ एंटरप्रायझेस एजन्सीची आर्थिक क्षमता नसताना त्यांना देण्यात आलेल्या कामाची चौकशी करावी, अनेक वर्षांपासून किमान वेतन कायदा व प्रस्थापित कामगार कायद्याच्या सोयी- सवलतीपासून कंत्राटी कामगारांना वंचित ठेवले, त्याची नुकसान भरपाई मिळावी, माजलगाव पालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार, चालक, माळी, वायरमन, पाणीपुरवठा विभागात एकूण १५० कामगार कार्यरत असून मुख्य मालकाने नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नाही या प्रकाराची चौकशी करावी, कामगारांना अनेक वर्षांपासूनची नुकसान भरपाई देऊन त्यांना थेट नियुक्ती द्यावी आदी मागण्यांचे निवेदन या वेळी रोजंदारी मजदूर सेनेने जिल्हा प्रशासनाला दिले. संघटनेचे राज्य सचिव गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात परळी पालिकेतील सोनूबाई आचार्य, अर्चना रायभोळे, उषा बनसोडे, रत्नमाला कसबे, राजूबाई आदोडे, सुशीला सरोदे, सुनील कांबळे, तसेच माजलगाव पालिकेतील पंचशीला शिनगारे, रमाबाई फंदे, राजूबाई साळवे, द्वारका भिसे, धम्मशीला वरकड, अविनाश अवचार यांच्यासह सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

Web Title: women protest rally