बीड जिल्ह्यात बलात्कार, छेडछाडीच्या घटना वाढल्या

जालिंदर धांडे
शुक्रवार, 3 मे 2019

कडक कारवाईची गरज
२०१५ मध्ये बलात्काराच्या ७८, तर छेडछाडीच्या २६३ घटना झाल्या होत्या. त्या तुलनेत २०१८ मध्ये बलात्काराच्या ८९ व छेडछाडीच्या २९३ घटना घडल्या आहेत. २०१५, १६, १७ च्या तुलनेत २०१८ पासून जिल्ह्यात महिलांच्या छेडछाडीच्या बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

२०१५ पासून आतापर्यंत ३०९ बलात्कार, एक हजार ६९ मुली व महिलांची छेडछाड
बीड - जिल्ह्यात महिला, मुलींच्या छेडछाड व बलात्काराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन युवती, नोकरी करणाऱ्या महिलांना छेडछाडीचा जादा त्रास सहन करावा लागत आहे. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात बलात्काराच्या ३०९ घटना घडल्या आहेत. छेडछाडीच्या घटनांची संख्याही एक हजार ६९ आहे. बदनामीच्या भीतीने अनेक जण फिर्याद देण्यास पुढे येत नाही. अशी संख्याही मोठी आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे निर्माण केले गेले; परंतु त्यांची अमंलबजावणी चांगल्या प्रकारे होत नसल्याचे दिसते. अत्याचार व छेडछाडीच्या घटनांची तक्रार बदनामी होईल म्हणून घरातील मंडळी करत नाहीत. तसेच, काही पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित अधिकारी उलट-सुलट प्रश्‍न विचारत असल्याची भीतीही असते. त्यामुळे छेड काढणाऱ्या रोडरोमिओंचे फावत आहे. शिक्षणासाठी जाणाऱ्या मुली व कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना रस्त्यावरील टवाळखोरांच्या विविध कृत्यांचा सामना करावा लागतो. 

रस्त्यांवर टवाळखोरांच्या टोळ्या
शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. शहरात विविध शाळा-महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस आहेत. यामुळे पहाटे पाचपासून शहरातील रस्त्यांवर मुलींची वर्दळ असते. मात्र, याच ठिकाणी काही टवाळखोर ठाण मांडून बसलेले असतात. या ठिकाणी जाता-येता मुलींना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. यामुळे शहरातील टवाळखोर व रोडरोमियोचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Women Rape Tampering Incidents Increase in Beed District