अनैतिक मानवी वाहतूक विभागाकडून ४९ पीडित महिलांची सुटका

जालिंदर धांडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

कुंटणखान्यावर अवैध धंदेवाल्यांची संख्या जास्त 
जिल्ह्यात कुंटणखान्यावरील कारवायांमध्ये पकडलेल्या ग्राहकांत सर्वांत जास्त संख्याही अवैध धंदे करणाऱ्यांची असल्याचे उघड झाले आहे.  दरम्यान, वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचीही समाजात बदनामी होत आहे.

बीड - जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या कुंटणखान्यांवर २०१७ पासून आतापर्यंत २२ छापे मारून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ४९ पीडित महिलांची सुटका केली आहे. यात विशेष म्हणजे सुटका करणाऱ्या आलेल्या पीडित महिलांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा सहभाग आहे. संशयित ८३ महिला व पुरुषांवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.   

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पुढाकाराने सध्या जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कार्यरत आहे. २०१७ मध्ये याच विभागातर्फे डमी ग्राहक पाठवून सात छापे मारण्यात आले. यात संशयित २८ पुरुष व सहा महिलांवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. यात १३ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता.

२०१८ मध्येही १२ ठिकाणी छापे मारून १२ संशयित महिला व १७ पुरुषांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात १९ पीडित महिलांची सुटका केली. जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत तीन केसेस केल्या असून, संशयित १३ पुरुष व सात महिलांवर कारवाई केली आहे. २०१७ पासून आतापर्यंत एकूण २२ कुंटणखान्यांवर छापे मारून ४९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. एक कारवाई औरंगाबाद शहरातही करण्यात आली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक भास्कार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत माने, फौजदार राणी सानप, एएसआय शिवाजी भारती, प्रताप वाळके, सुरेखा उगले, सिंधू उगले, निलावती खटाणे, मीना घोडके, शेख शमीम पाशा, सतीश बाहेखाळ व चालक विकास नेवडे यांनी कारवाया केल्या आहेत.

अजूनही कुठे असे प्रकार होत असतील, तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा, नावे गुपित ठेवण्यात येतील. 
- भारत माने, फौजदार, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष, बीड

Web Title: Women Release by Immoral Human Transport Department Crime Police