महिलांसाठी लवकरच "अस्मिता' योजना आणणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

औरंगाबाद - ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या असून, फक्त 15 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरतात तर यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचेही प्रमाण जास्त आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, विकास व्हावा, याकरिता लवकरच "अस्मिता' नावाची योजना आणणार असून, त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उद्‌घाटनप्रसंगी दिली. 

औरंगाबाद - ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या असून, फक्त 15 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरतात तर यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचेही प्रमाण जास्त आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, विकास व्हावा, याकरिता लवकरच "अस्मिता' नावाची योजना आणणार असून, त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उद्‌घाटनप्रसंगी दिली. 

अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर महापौर बापू घडामोडे, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, उपायुक्त सूर्यकांत हजारे, पारस बोथरा, समाजकल्याण सभापती शीला चव्हाण, सिल्लोड पंचायत समिती सभापती लता वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, एक वर्षात सुमतीबाई सुकळीकर योजनेत हजारो बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले आहे. महिलांनी परिश्रमाची तयारी ठेवावी, सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बचतगटांच्या महिलांनी मोठे स्वप्न बघावे, लाचारी पत्करू नका, तुम्ही सावित्री, जिजाऊंच्या लेकी आहात, राज्यात येत्या काळात 3 लाख 10 हजार बचतगट करणार आहोत, असे श्रीमती मुंडे म्हणाल्या. महिलांसाठी "अस्मिता' योजना आणली जात असून, यामध्ये बचतगटांच्या माध्यमातून महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जातील. ते बाजारापेक्षा 40 ते 50 टक्के स्वस्त असतील. महिलांमध्ये गर्भाशयाचे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोफत किंवा अनुदानावर त्यांना लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे मोफत निदान करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ऍसिड हल्ला झालेल्या महिला, तरुणींचे पुनर्वसनाचे कामही सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, बचतगटांनी दरवर्षी आपला हिशेब मांडून प्रगती करावी. दरवर्षी आपले उत्पादन कसे विक्री होईल, याची व्यवस्था केली पाहिजे. 

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर प्रास्ताविकात म्हणाले की, मराठवाड्यात 47 हजार बचतगट स्थापन केले असून, यात 5 लाख महिलांचा समावेश आहे. यातील काही समूहांनी लघुउद्योग उभारले. तसेच बचतगटांना 36 कोटी रुपयांचे खेळते भांडवल कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. यावेळी सिद्धा स्मरणिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमात विभागस्तरावरील तीन बचतगटांना पुरस्कार देण्यात आले. यात प्रथम - स्वामी समर्थ बचतगट विहामांडवा, औरंगाबाद, द्वितीय- अहिल्यादेवी होळकर बचतगट रामेगाव लातूर, तृतीय-गृहलक्ष्मी बचतगट तुळजापूर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Web Title: For Women soon asmita rolling plan