तुटलेल्या खिडक्‍यांमुळे मातांना पावसासह गारव्याचा त्रास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

कांगारू मदर केअरसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत सकारात्मक पावले उचलले जाण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत वॉर्डासमोरील जागेतील खिडक्‍यांच्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत. लवकरच दुरुस्ती होईल. 
- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, एनआयसीयू विभागप्रमुख, घाटी.

औरंगाबाद : घाटीतील नवजात शिशू अति दक्षता विभागाच्या (एनआयसीयू) व्हरांड्यात मातांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र या ठिकाणी असलेल्या खिडक्‍या तुटलेल्या आहेत. त्यामुळे त्यातून पावसाच्या थेंबांसह गार वारा येत असल्याने बाळंतिणींना त्रास सहन करावा लागत आहे. 

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी घाटीमध्ये पहिल्यांदा एनआयसीयू विभाग सुरू झाला; पण या विभागाला शासनाकडून उपेक्षा सहन करावी लागत आहे. राज्यातील पदव्युत्तर पदवीसाठी मान्यता मिळाल्यानंतरही येथे प्राथमिक सुविधा देण्यासाठी शासन सीएसआरची वाट पाहत आहे. त्यामुळे नातेवाइकांसह मातांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या ठिकाणी मातांना बसण्यासाठी ज्या व्हरांड्यात व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणच्या खिडक्‍या तुटलेल्या आहेत. त्यातून गार हवा आणि पावसाचे शिंतोडे अंगावर येत आहेत. त्याचा परिणाम बाळंतिणींच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे खिडक्‍यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. शनिवारी (ता. सात) या खिडक्‍या दुरुस्त्या केल्या जातील, अशी माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. दरम्यान, सीएसआर फंडातून कांगारू मदर केअर वॉर्ड उभारण्यासाठी डॉ. लक्ष्मीकांत देशमुख प्रयत्नशील आहेत. शिवाय त्यांनी शासनाकडेही पाठपुरावा सुरू केले आहे; मात्र अद्याप यश मिळाले नाही. 

कांगारू मदर केअरसाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत सकारात्मक पावले उचलले जाण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत वॉर्डासमोरील जागेतील खिडक्‍यांच्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या आहेत. लवकरच दुरुस्ती होईल. 
- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, एनआयसीयू विभागप्रमुख, घाटी.

Web Title: women treatment in ghati hospital aurangabad