महिलेने फुलविला ‘जरबेरा’चा मळा

कुन्हाळी (ता. उमरगा) - आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकरी वैशाली आष्टे यांनी फुलविलेली जरबेराची शेती.
कुन्हाळी (ता. उमरगा) - आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकरी वैशाली आष्टे यांनी फुलविलेली जरबेराची शेती.

उमरगा - कुन्हाळी (ता. उमरगा) येथील शिक्षित शेतकरी वैशाली कैलास आष्टे यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून जरबेरा फुलाचे उपादन घेऊन समृद्धी साधली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून दहा गुंठे क्षेत्रात जरबेरा फुलाचे उत्पादन सुरू असून, आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळातही दिलासा मिळाला आहे आणि इतरांसाठी आदर्श.

पारंपरिक शेतीऐवजी वैशाली आष्टे यांनी आधुनिक शेती पद्धतीचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये साडेबारा लाख रुपये खर्चाच्या पॉलिहाऊसची उभारणी केली. त्यासाठी कृषी विभागाने सव्वाचार लाखांचे अनुदान दिले होते. पॉलिहॉऊसमध्ये पहिले उपादन जरबेराचे घेण्याचे ठरविले. त्याची एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे फुले मिळतात. एका रोपामागे वर्षभरात ६५ ते ८० फुले मिळतात. पॉलिहाऊसच्या १० गुंठे क्षेत्रात साधारणतः तीन वर्षे फुलांचे उत्पादन घेतल्यानंतर आष्टे यांनी एक ऑक्‍टोबर १०१८ मध्ये पूणे येथून सहा हजार २५० जरबेरा फुलांची रोपे आणली. त्यासाठी दोन लाख २८ हजार रुपये खर्च केले. लागवडीनंतर २५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष फुले विक्रीसाठी सज्ज झाली. दररोज आठशे ते नऊशे फुले निघतात. प्रतिफुलास दोन ते बारा रुपयांपर्यंत दर मिळतो. फुलांसाठी हैदराबादची बाजारपेठ जवळ असली, तरी सध्या लग्नसराईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी आहे. प्रत्येक फुलास आठ ते नऊ रुपयांचा दर मिळत असला, तरी वाहतूक, पॅकिंग व कमिशनच्या खर्चात बचत होत असल्याने सध्या चांगला नफा आहे. दरम्यान, गेल्या साडेचार महिन्यांत तीन लाख ६० हजार रुपये फूल विक्रीतून मिळाले. दरमहा साधारणतः १५ ते २० हजारांचा खर्च होत आहे. खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा साडेचार महिन्यांत झाला आहे.

आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेता येते. पॉलिहाऊसच्या उभारणीमुळे उत्पन्नाचे नवनवीन प्रयोग साध्य करता येतात. पहिल्यांदा खर्च करण्याचे धाडस केले, त्यानंतर चांगले उत्पन्न मिळत गेले. कृषी विभागाने पॉलिहाऊस उभारणीसाठी अनुदान दिले; मात्र लागवडीचे अनुदान अजून मिळत नाही; तरीही जिद्द सोडली नाही. ‘जरबेरा’ने चांगली साथ दिल्याने समृद्धीचा मार्ग मिळाला. शेती प्रयोगात पतीचीही चांगली साथ मिळाली. महिलांनी आधुनिक शेतीचे तंत्र वापरून नव्याचा ध्यास घ्यायला हवा.   
- वैशाली कैलास आष्टे, कुन्हाळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com