महिलांचे देशाच्या उन्नतीमध्ये भरीव योगदान - नवल किशोर राम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

बीड - महिलांना सामाजिक आणि आर्थिक समानता देणे ही काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती इतर क्षेत्रांत चांगले काम करण्याबरोबरच स्वत:च्या घराचा आधार बनून कुटुंबाच्या आणि देशाच्याही उन्नतीमध्ये भरीव योगदान देऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

बीड - महिलांना सामाजिक आणि आर्थिक समानता देणे ही काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती इतर क्षेत्रांत चांगले काम करण्याबरोबरच स्वत:च्या घराचा आधार बनून कुटुंबाच्या आणि देशाच्याही उन्नतीमध्ये भरीव योगदान देऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात बुधवारी (ता.आठ) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे सीईओ नामदेव ननावरे, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार छाया पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह सोळंके, पोलिस उपअधीक्षक अंजुम शेख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, महिला व बालविकास अधिकारी आर.डी.कुलकर्णी, पॅराऑलिंपीक विजेती खेळाडू कोमल बोरा, डॉ. जयश्री बांगर, डॉ. प्रतिभा पवार, पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त डॉ. सुरेखा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की, महिलांपेक्षा पुरुष प्रत्येक बाबतीत अग्रेसर आणि सक्षम आहेत, अशी समाजामध्ये पूर्वापार चालत आलेली मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्यांनी पुरुषांबरोबरच किंवा पुरुषांपेक्षाही चांगली कामगिरी करून दाखविल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. बीड जिल्ह्यात स्त्री-पुरुष जन्माचे प्रमाण हे व्यस्त आहे. त्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्त्रीभ्रूण हत्या आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पॅराऑलिंपीक विजेती खेळाडू कोमल बोरा आणि डॉ. प्रतिभा पवळ यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गावातील अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अंगणवाडीसेविकेचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच ज्या बचतगटांनी घेतलेले कर्ज मुदतीत भरले, अशा बचतगटांच्या महिलांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक विभागातर्फे सात महिलांना मतदार ओळखपत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. जयश्री बांगर, डॉ. सुरेखा माने, साधना गंगावणे, संध्या दुबे आणि डॉ. महात्मे यांनी महिलांशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गणेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. विस्तार अधिकारी लिंबाळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्ती यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला मतदारांसाठी विशेष मोहीम
महिलांना शंभर वर्षांपूर्वी कोणत्याही देशात मतदान करण्याचा हक्क नव्हता. महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी आंदोलने करण्यात आली. त्यानंतर महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर ज्या महिलांचे नाव मतदारयादीमध्ये नाही ते यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली.

Web Title: Women's contribution to the betterment of the country