पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरूच

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरूच


दावरवाडी (जि.औरंगाबाद) : दावरवाडी (ता. पैठण) परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील सर्वच गावांत पिण्याच्या पाण्यासाठी अद्यापही महिलांची भटकंती सुरूच आहे. त्यामुळे ही समस्या खूप गंभीर झाली आहे. शासनाने ता. 1 ऑगस्टपासून परिसरातील सर्व गावांचा टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. परिसरात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे तलाव कोरडेठाक असून बोअरवेल, विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे परिसरातील खेर्डा प्रकल्प, दावरवाडी तलाव व वीरभद्रा नदी कोरडीठाक पडली आहे.


या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयाने पुन्हा टॅंकर सुरू करण्याची मागणी केली व प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाची चांगलीच धांदल उडाली. कारण मंजूर टॅंकर हे त्या ग्रामपंचायतीने गावात उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून पाणी भरण्याची सूचना दिली. पण, परिसरात टॅंकर भरण्यासाठी कुठेही पाणी नसल्यामुळे टॅंकर मंजूर होऊन ते भरण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी त्वरित सरकारी पॉंईट उपलब्ध करून द्यावा या संबंधीची मागणी नांदरचे सरपंच ऍड. किशोर वैद्य, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष रेवणनाथ कर्डीले, दावरवाडीचे सरपंच उत्तमराव खांडे, कुतुबखेडाचे माजी सरपंच सुनील चितळे, ग्रामपंचायत सदस्य संजय सदावर्ते, माजी पंचायत समिती सदस्य विजय गायकवाड, पंढरीनाथ सोनवणे, विठ्ठल तळपे, माउली पठाडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.


प्रशासनाकडे पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला असून शासनाने परिसरातील कोणत्याही विहिरीत पाणी असल्यास ती विहीर अधिग्रहीत करण्यात यावी, अशी अट घातली आले. जर परिसरातील विहिरींना पाणी असते तर टॅंकर मागणीचा प्रस्तावच दिला नसता. सध्या नांदर ग्रामस्थांना कॉंग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे यांनी आपल्या शेततळ्यातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.
- किशोर वैद्य, सरपंच, नांदर.


धरण उशाला कोरड घशाला अशीच परिस्थिती सध्या पैठण तालुक्‍यात पाहावयास मिळत असून प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळेच परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने या विषयांवर योग्य ते नियोजन न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
- रेवणनाथ कर्डिले, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com