तिच्यासाठी तिनेच शोधल्या संवादाच्या वाटा

सुषेन जाधव
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

औरंगाबाद - तिने घराबाहेर पडावं, तिलाही स्वातंत्र्य मिळावं या गोष्टी आजही केवळ बोलण्यापुरत्याच मर्यादित आहेत. त्यावर तोडगा काढत तिचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी तिनेच पुढाकार घेतला. तिच्यासारख्या अनेकींच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळत गेली अन्‌ तिच्यासाठी संवादाच्या वाटा शोधल्या गेल्या त्या "वुमनविश्‍व'च्या माध्यमातून...

औरंगाबाद - तिने घराबाहेर पडावं, तिलाही स्वातंत्र्य मिळावं या गोष्टी आजही केवळ बोलण्यापुरत्याच मर्यादित आहेत. त्यावर तोडगा काढत तिचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी तिनेच पुढाकार घेतला. तिच्यासारख्या अनेकींच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं मिळत गेली अन्‌ तिच्यासाठी संवादाच्या वाटा शोधल्या गेल्या त्या "वुमनविश्‍व'च्या माध्यमातून...

औरंगाबादेतून शिक्षण घेतलेली कनक वाईकर ही मूळची परभणीची. शिक्षण झाल्यानंतर ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी करतानाही छोटे-मोठे अनुभव मिळत गेले. यातून महिलांसाठीही व्यासपीठ निर्माण करावे, तिच्यासाठी संवादाच्या वाटा निर्माण व्हाव्यात, यासाठी कनक वाईकर, श्रुती गुप्ता, वर्षा गायकवाड या तरुणींनी www.womenvishwa.com हे खास व्यासपीठ निर्माण केले आहे. शिवाय वुमनविश्‍व नावाचे खास ऍप्सही तयार केलेले आहे.

दररोजच्या अनुभवातून महिलांचे प्रश्‍न केवळ मांडल्याने सोडवता येत नाहीत, तर वाढत्या सोशल मीडिया आणि स्मार्ट इंटरनेट वापरातून विविध प्रश्‍नांबरोबरच तिच्या करिअरच्या वाटा, आरोग्याचे प्रश्‍न, सामाजिक जीवनातील समस्यांचा सामना आदींविषयी जनजागृती करूनही सोडवू शकतो. टेक्‍नॉलॉजीतून अनेक समस्यांवर उत्तरे शोधता येतात. त्यामुळे आत्मविश्‍वासाने ही वेबसाईट तयार केली आहे. तसेच यातून आतापर्यंत महिलांचे प्रश्‍न, समस्या मांडून तज्ज्ञांकडून त्यांची उत्तरे मिळविली आहेत. याचबरोबर त्यांना करिअरचे नवे पर्याय याबद्दलही आपल्या भाषेत माहिती मिळते. वेबसाईटच्या माध्यमातून कॅन्सर जागरूकता मोहीमही राबविल्याचे कनकने सांगितले.

वेबसाईट खास मराठीतून
आजवर बऱ्याच वेबसाईट तयार झाल्या; परंतु आपली भाषा नसल्याने वेबसाईटमधून अपेक्षित माहिती मिळत नाही. मराठीतून वेबसाईट मोजक्‍याच असतील. ही वेबसाईट मराठीतून असल्यामुळे महिलांना योग्य करिअर मार्गदर्शनाबरोबरच, इतर विविध प्रश्न, समस्या यावर सल्ला देण्यासाठी डॉक्‍टर, वकील, समुपदेशक उपलब्ध असतात. महिला आपल्या समस्या, प्रश्न विचारतात. यामुळेच महिला एकमेकींना जोडल्या जाऊ लागल्या आहेत. इस्रायलमधील मराठी भाषक स्त्रिया ते अंबाजोगाई (जि. बीड) येथील स्त्री आज एकमेकींशी देवाणघेवाण करत आहेत.

महिला, तरुणींसाठी कार्यशाळा
"वुमनविश्व'च्या माध्यमातून महिला, विद्यार्थिनींसाठी कौशल्य विकास कार्यशाळा, तसेच विविध करिअर पर्याय शोधून देणारे मार्ग यावर काम करणार आहे. इतर भारतीय भाषांमध्येही काम करणार असल्याचे कनक हिने सांगितले.

'घर सांभाळणारी, थोडक्‍यात साधीसरळ संसाराची आवड असणारी मुलगी' या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडणे अवघड जात आहे. असे असले तरी वुमनविश्‍वच्या माध्यमातून महिलांच्या अनेक समस्यांवर उत्तरे मिळत आहेत. वुमनविश्व हे नॉलेज शेअरिंगसारख्या स्टार्ट अपचा एक प्रकारच आहे.''
- कनक वाईकर, संस्थापिका, वुमनविश्‍व.

Web Title: womenvishwa