वाळूज येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आर. के. भराड
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भरधाव जाणारा कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय कामगार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई - नागपूर एक्‍स्प्रेस वेवरील तनवाणी शाळेजवळ झाला. 

वाळूज (जि. औरंगाबाद) - भरधाव जाणारा कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय कामगार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई - नागपूर एक्‍स्प्रेस वेवरील तनवाणी शाळेजवळ झाला. 

बंडू बाबूराव मोहिते (45, रा. टापरगाव, ता. कन्नड, हल्ली मुक्काम बजाजनगर) असे मृताचे नाव आहे. ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो कंपनीत कामाला होते. गुरुवारी ते सकाळी दुचाकीने (एमएच 20, बीव्ही 3996) लासूर येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येताना सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई-नागपूर एक्‍स्प्रेस वेवरील तनवाणी शाळेसमोर एएस क्‍लबकडून लासूरकडे भरधाव जाणारा कंटेनर (जीजे 12, एटी 6934) व दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यामुळे मोहिते रस्त्यावर पडून कंटेनरच्या चाकाखाली आले. कंटेनरचे चाक डोक्‍यावरून गेल्याने मोहिते जागीच ठार झाले.

अपघातानंतर कंटेनर लासूरच्या दिशेने भरधाव निघून गेला. दरम्यान, या मार्गावरून येणाऱ्यांनी फरारी होत असलेल्या कंटेनरचा नंबर लिहून घेत घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
  
मुलासाठी आणले होते पैसे 
बंडू मोहिते यांचा मुलगा बारावी पास झाल्याने तो बजाजनगर येथील गरुडझेप ऍकॅडमीत प्रवेश घेणार होता. त्यासाठी मोहिते यांनी लासूर येथील नातेवाइकांकडून पैसे घेतले होते. हे पैसे घेऊन येतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. अपघातानंतर त्यांच्या खिशात 45 हजार रुपये आढळून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker killed in bike accident at Waluj