जागतिक स्वमग्नता जागृती दिन विशेष

राजेभाऊ मोगल
रविवार, 2 एप्रिल 2017

स्वमग्न मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवावा

स्वमग्न मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवावा
औरंगाबाद - माहिती, तंत्रज्ञानाने जग मुठीत सामावताना, संवादाचे क्षेत्र व्यापक होत असताना स्वमग्नतेच्या समस्येत अडकलेली मुले मात्र त्यापासून कोसो दूर आहेत. जन्मतःच सोबत येणाऱ्या या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हिच चिंतेची बाब आहे. स्वमग्न मुले आपल्या जन्मदात्यांशीही संवाद साधू शकत नाहीत, हे वास्तव आहे. हे चित्र बदलण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशा मुलांसाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अशा मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी समुपदेशन, प्रशिक्षण एवढेच नव्हे; तर त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

भारतात दर हजार मुलांमागे किमान एक मूल स्वमग्न जन्माला येते. अशा मुलांच्या विकासासाठी कुठलेही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता स्वमग्न मुलांच्या भाषाविकासात येणारे अडथळेच प्रगतीसाठी घातक ठरत असल्याची बाब समोर येत आहे. या मुलांमध्ये जगण्यासाठी किमान आवश्‍यक भान, समज निर्माण करण्यासाठी येथील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) रुख्मिणीदेवी स्वमग्न फाउंडेशन; तसेच सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ संचलित विहंग फाउंडेशन काम करीत आहेत. "विहंग'मधील सहा वर्षांचा सार्थक एक मिनीटभरही शांत बसत नसे. आवश्‍यकता ओळखून त्याला प्रशिक्षण देण्यात आल्याने त्याच्यामध्ये हळूहळू बदल झाला आहे. आता तो स्वत:च्या हाताने शांत बसून चमचाद्वारे जेवण करतो. स्वराजनेही कविता लेखनास सुरवात केली असून, छान गाणे गात असतो. ही बाब निश्‍चितच आनंदाची आणि आशादायक चित्र निर्माण करणारी आहे.

स्वमग्नता कशी ओळखावी
- जन्मानंतर सहा महिन्यांत लक्षणे दिसतात
- दोन वर्षांनंतर साधारणतः वैद्यकीय निदान शक्‍य
- सतत निर्जीव वस्तूंसोबत खेळत राहणे
- उजेड, आवाजामुळे त्रास होणे
- स्पर्शदेखील सहन न होणे
- वारंवार एकच कृती करीत राहणे

असे होतात परिणाम
शारीरिक वाढ होत असताना समाजात कसे वावरायचे, याबद्दल या मुलांना काहीही माहिती नसते. उलट वय वाढत असतानाही अशी मुले स्वत:मध्येच रममाण झालेली दिसतात. त्यामुळे जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी म्हणजे किमान स्वत:ची तरी काळजी घेता यायला हवी, एवढे तरी ते सक्षम व्हायला हवेत.

अशी घ्यायला हवी खबरदारी
दांपत्याच्या 30 ते 35 वयाच्या आत मूल जन्माला यायला हवे. गर्भवतीचे मानसिक स्वास्थ्य चांगले असायला हवे. त्यासाठी घरात तसे पोषक वातावरण ठेवावे. कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्‍शन होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. गर्भवती मातेचे स्वास्थ्य चांगले राहिल्यास बाळावर चांगला परिणाम होतो.

स्वमग्न मुलांची इतर मुलांप्रमाणेच शारीरिक वाढ होते. मात्र, भाषाविषयक ज्ञान आत्मसात करण्यात त्यांना अडचणी येतात. त्यामुळे स्वत: कसे वागायचे, घरात, समाजात कसे वावरायचे, याबद्दल त्यांना काहीही कळत नाही. अशा मुलांना औषधांचा सध्यातरी फारसा फायदा होत नाही. अशी मुले नेमक्‍या कोणत्या कारणामुळे जन्माला येतात, याबद्दल जगभरात संशोधन सुरू आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून "स्वमग्न'तेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. माणिक भिसे, मनोविकार तज्ज्ञ, एमजीएम रुग्णालय, औरंगाबाद

स्वमग्न मुलांना नेमके आपल्याला काय हवे, काय नको, हेच सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्याशी एकरूप होऊन गरजा लक्षात घ्यावा लागतात. यासाठी स्वतंत्र विशेष अभ्यासक्रम तयार करून तो प्रत्येक शाळेमधून विशेष प्रशिक्षकामार्फत राबविण्याची गरज आहे; तरच या गुंतागुंतीच्या प्रश्‍नांवर तोडगा काढता येईल.
- आदिती शार्दूल, प्रकल्प संचालक, विहंग फाउंडेशन, औरंगाबाद

Web Title: The world autism awareness day