सलीम अली सरोवरावर जलपर्णीचे पांघरुण 

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या सलीम अली सरोवरावर सध्या जलपर्णीने पांघरुण घातले आहे. समृद्ध जैवविविधता असलेल्या शहरातील एकमेव पाणथळीवरील ही वनस्पती पक्ष्यांसाठी चांगला निवारा ठरत असली, तरी ती केवळ सांडपाण्यावर वाढत असल्याने संपूर्ण तलावावर त्याचे साम्राज्य पसरणे अयोग्य असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. 

औरंगाबाद - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या सलीम अली सरोवरावर सध्या जलपर्णीने पांघरुण घातले आहे. समृद्ध जैवविविधता असलेल्या शहरातील एकमेव पाणथळीवरील ही वनस्पती पक्ष्यांसाठी चांगला निवारा ठरत असली, तरी ती केवळ सांडपाण्यावर वाढत असल्याने संपूर्ण तलावावर त्याचे साम्राज्य पसरणे अयोग्य असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. 

सलीम अली सरोवरात सध्या 70 टक्के सांडपाणीच आहे. हे पाणी बंद झाले, तर तलाव मार्चमध्येच कोरडा होतो. तलाव परिसरात 132 प्रकारचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी, 32 प्रकारची फुलपाखरे, 85 प्रकारचे कीटक, सात प्रकारचे साप आणि शेकडो वृक्ष, वेली आणि पाणवनस्पती आढळतात. तलावाभोवताली असलेल्या सुमारे 600 वृक्षांमुळे हा भाग शहराचा छोटासा ऑक्‍सिजन हबच आहे. "जपानी गार्डन'च्या धर्तीवर महापालिकेने 2013 मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून त्या परिसराचे सुशोभीकरण केले; मात्र येथील रहदारी आणि वावर वाढला, तर जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असा आक्षेप घेत "सलीम अली सरोवर संवर्धन समिती'चे डॉ. किशोर पाठक, मिलिंद गिरिधारी, पंकज शक्करवार, अरविंद पुजारी, डॉ. विवेक घारपुरे, राजेंद्र धोंगडे आदी पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने या ठिकाणी कुठलेही काम करण्यावर स्थगिती आणून येथील जैवविविधता जपण्यासाठी विशेष काळजी घेण्याचेही महापालिकेला सुनावले होते. काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मुख्य गेट तोडून सरोवर खुले करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो हाणून पाडण्यात आला. हिमायतबाग आणि सलीम अली सरोवराचा परिसर हा "जैवविविधता वारसा क्षेत्र' (बायोडायव्हर्सिटी हेरिटेज झोन) घोषित करण्याची निसर्गप्रेमींची मागणी असून, त्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

दिल्लीगेट, गणेश कॉलनीच्या बाजूने तलावात भर घालून अतिक्रमण. 
परिसर बनला जुगारी, दारूड्यांचा अड्डा. म्हशी चारणाऱ्यांची घुसखोरी. 
महापालिकेने कारवाई करून अतिक्रमण काढावे. 
पक्ष्यांच्या शिकारीचाही प्रयत्न. सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी. 

तलावाच्या पूर्वेकडील जलपर्णीने भरलेल्या बाजूला पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात निवारा केला आहे. ही वनस्पती त्या दृष्टीने चांगली आहे; पण ती संपूर्ण तलावावर पसरावी, असे वाटत नाही. सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन तलावातील जलचरांना शुद्ध ऑक्‍सिजनयुक्त पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजेत. 
-डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ज्ञ 

फार कमी शहरांना असे वैभव मिळाले आहे; पण मुख्य तलावाला अतिक्रमणाचा आणि जलपर्णीचाही वेढा आहे. जलपर्णी केवळ दूषित पाण्यातच येते. सध्या पाण्यात जलपर्णी वाढली आहे म्हणजे आठ कोटी खर्चून उभारलेला प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. हे योग्य नाही. तलावाचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. 
- मिलिंद गिरिधारी, पर्यावरणतज्ज्ञ 

Web Title: World Biodiversity Day story