शिस्त अन्‌ सहकार्याची ठरेल जागतिक धम्म परिषद

sadanand mahastavir in auragabad dhamma parishad
sadanand mahastavir in auragabad dhamma parishad

औरंगाबाद : शहरात पहिल्यांदाच तीनदिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद पीईएसच्या क्रीडा संकुलावर शुक्रवारी (ता.22) ते रविवार (ता.24) दरम्यान होणार आहे. या परिषदेसह चौका येथील लोकुत्तरा विहारात धम्मदेसना होणार आहे.

त्यासाठी परिषदेत येणाऱ्या प्रत्येक उपासक उपासिकांमध्ये शिस्त, मैत्री आणि सहकार्याची भावना दिसेल. लाखोंच्या संख्येने येथे लोक येतील. त्यामुळे पोलिसांसह इतर यंत्रणांवर ताण येणार नाही, असा विश्‍वास भारतीय भिक्‍खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

परिषदेसाठी जपान, थायलंड, नेपाळ, चीन, कोरियासह विविध पंधरा देशांतून शंभरहून अधिक भिक्‍खूंचे आगमन शहरात होणार आहे. तसेच देशभरातून दोनशेहून अधिक भिक्‍खू या परिषदेला हजेरी लावणार आहेत. तसेच देशविदेशातील उपासकही परिषदेसाठी येत आहेत. केवळ भिक्‍खूंसाठी चौका येथील लोकुत्तरा महाविहारामध्ये शनिवारी (ता.23) जगात शांतता व मैत्रीची भावना निर्माण करणारे दलाई लामा हे मार्गदर्शन करतील. तर देशविदेशातून आलेले भिक्‍खू आपल्या विचारांचे आदानप्रदान करणार आहेत.

रविवारी सकाळी नऊ वाजता दलाई लामा पीईएस मैदानावर उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतील. त्यावेळी येथील समुदायाला समजण्यासाठी भाषांतरकारही तेथे असतील. 

बहुजन हिताय बहुजन सुखाय

दलाई लामा दुसऱ्यांदा शहरात येत आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. त्यांच्यासारखेच जगभरातील भिक्‍खूही परिषदेला येत आहेत. यातून बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा संदेश सामान्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सदानंद महास्थवीर यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला विपश्‍यना प्रशिक्षणाचे बंगळुरू येथील मार्गदर्शक विनय रखिता महाथेरो, नागपूरचे ज्ञानबोधी महाथेरो, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. अरविंद गायकवाड, आर. के. गायकवाड, यशवंत कांबळे, कृष्णा भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा  : जागतिक धम्म परिषदेची तयारी जोरात 

ऐतिहासिक भूमीत ऐतिहासिक परिषद

येथील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना बुद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. त्याच भूमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याने तसेच नागसेनवन भूमीलाही इतिहास असल्याने येथे जागतिक धम्म परिषद भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लोकुत्तरा महाविहाराचे अध्यक्ष बोधिपालो महाथेरो यांनी सांगितले. 

लोकुत्तरा महाविहारातून थेट प्रक्षपेण करणार 

लोकुत्तरा महाविहारातील प्रशिक्षण केंद्रात आलेल्या देशविदेशातील भिक्‍खूंना दलाई लामा मार्गदर्शन करतील. त्यांच्यामध्ये सुरू असलेला संवाद पीईएस क्रीडा संकुलावर उपस्थित असलेल्या जनसुमदायाला ऐकायला आणि पाहायला मिळावा म्हणून त्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य संयोजक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

जगभरात शांतीचा संदेश

बुद्ध तत्त्वज्ञानाची उत्पत्ती भारतातील. हे तत्त्वज्ञान जगातील अनेक देशांनी स्वीकारले. कारण कुठल्याही वाद-विवादात बौद्ध तत्त्वज्ञान अडकले नाही. देशात सुख-शांती नांदावी, भारत प्रबुद्ध होण्यासाठी एकतेचा संदेश बुद्धांनी दिला. त्याचे प्रात्यक्षिक येथील भूमीवर केलेले आहे. लोकुत्तरा भिक्‍खू प्रशिक्षण केंद्रातून धम्माचे शिक्षण दिले जाते. त्याचीही माहिती इतर देशांतून येणाऱ्या प्रतिनिधींना, भिक्‍खूंना मिळणार असून, बुद्धांचा शांतीचा संदेशही जगभरात पोचविण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com