घाटीत हिमोफेलियाच्या रुग्णांना वैश्‍विक अपंग प्रमाणपत्र 

ghati
ghati

औरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने गुरुवारी (ता. सहा) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पाच हिमोफेलियाग्रस्तांना वैश्‍विक अपंग प्रमाणपत्राचे वाटप केले; मात्र अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका रुग्णालयात ही सेवा सुरळीत झाली नाही. 

पूर्वी एसएडीएम प्रणालीवर केवळ सहा प्रकारचे दिव्यांग प्रणाणपत्र मिळत होते. आता स्वावलंबन कार्ड या केंद्रीय प्रणालीतून 21 प्रकारचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणार आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सेवेत पहिल्यांदा लोकोमोटर व हिमोफेलियाच्या दिव्यांगांना एसएमएस करून बोलावण्यात आले होते. त्यातील पाच जणांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. सध्या घाटीकडे या वेबसाईटवरून 28 अर्ज प्राप्त आहेत. 

आतापर्यंत मराठवाड्यातील हिमोफेलियाच्या 345 रुग्णांना केईएम रुग्णालयात या प्रमाणपत्रासाठी जावे लागत होते, असे सौरभ धूत म्हणाला. या कार्डमुळे दिव्यांगांच्या सेवा-सवलती, योजनांचा लाभ मिळणार असल्याचा आनंद असल्याचे सागर चुंगडे यांनी सांगितले. दोन वर्षांपासून या दिवसाची वाट पाहत होतो. दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद असल्याचे अमोल जाधव म्हणाले. यासह मुबसीर खान व वरुण साबळे यांनाही यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. कैलास झिने, डॉ. अब्दुल्ला अन्सारी, डॉ. मुक्तदिर अन्सारी, डॉ. सतीश मसलेकर, डॉ. अभिषेक कल्लूरकर, विजय वारे, डॉ. शरद साळोखे, डॉ. मिलिंद लोखंडे, डॉ. श्रेयश घोटवडेकर, डॉ. अनुज पाटील, डॉ. मशुदुल्ल शेख, डॉ. प्रतीक राठोड, शारदा शिंदे यांची उपस्थिती होती. 

इथे करा अर्ज 
स्वावलंबन कार्डसाठी (यूडीआयडी) www.swawlambancard.gov.in या संकेतस्थळावर दिव्यांगांनी ऑनलाइन अर्ज करून त्यात पूर्ण माहिती भरावी. फॉर्म "ए' पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट व पावती, पासपोर्ट साईज कलर फोटो, ओरिजिनल आधार कार्डसह घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात 116-117 या ओपीडीमध्ये मंगळवारी व गुरुवारी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

इथे आहे सुविधा 
ओपीडी 116-117 मध्ये हिमोफेलिया, पॅरालिसीस, अस्थिव्यंग, हात-पाय गमावलेले, शारीरिक वाढ खुंटलेले, बहुदिव्यांगता, सिकलसेल, पार्किन्सन, ऍसिड ऍटॅकग्रस्तांनी, तर नेत्ररोग विभागात ओपीडी 107 मध्ये दृष्टिदोष, दृष्टिहीन यांनी, तर ओपीडी 134 मध्ये बहिरेपणा, वाचा भाषा दोष, कान-नाक-घसासंदर्भातील अपंग, मानसोपचार विभागात ऑटिझम, लर्निंग डिसॅबिलिटी, मतिमंद आदी प्रमाणपत्रांची सुविधा घाटीने सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com