डॉक्‍टर-रुग्णातील संवाद अन्‌ विश्‍वासही वाढावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - डॉक्‍टराला आजही देवरूप मानले जाते. ॲलोपॅथीच्या अगोदर नाडीपरीक्षणावरून वैद्य उपचार करायचे; तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे नाते होते. बदलत्या काळात उपचार बदलत गेले तसे नातेही बदलले. रुग्ण वाढले, संवाद खुंटला. त्यात डॉक्‍टर-रुग्ण नातेही काहीसे व्यावसायिक झाले. त्यामुळे अनेकदा वादही होतात. चांगल्या उपचारासाठी डॉक्‍टर-रुग्ण संवाद आणि विश्‍वासही वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने वर्ष १९४८ मध्ये अंतर्भूत प्रतिष्ठा आणि सर्वांना समान अधिकार ही घोषणा केली. शासकीय आरोग्याच्या तोकड्या सुविधा, आरोग्याच्या योजनांची गुंतागुंत व अपूर्ण माहिती यात सर्वसामान्य रुग्णांची ससेहोलपट होते; मात्र खासगी व धर्मदायी रुग्णालयांतही अनेकदा वादाचे प्रसंग उभे राहतात. त्याला रुग्ण-डॉक्‍टरांतील हरवत चाललेला संवाद कारणीभूत असल्याचे जाणवते; तर शासकीय रुग्णालयांत तोकडी साधनसामग्री आणि वाढलेल्या रुग्णसंख्येचा ताळमेळ बसलेला नाही. त्यामुळे आर्थिक दुर्बल व गरीब रुग्णांना धर्मदायी रुग्णालयांत सवलतीची सुविधा आहे. कामगार, शेतकरी, दारिद्य्ररेषेखाली रुग्णांनाही विविध सुविधा दिलेल्या आहेत. रुग्ण नातेवाइकांनी साधलेला आपुलकीचा संवाद आणि डॉक्‍टरांनी त्याला जर योग्य साद दिली तर उपचाराचा मार्गही सुखकर होईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

सुरक्षित, अत्याधुनिक आणि गुप्तता बाळगून रुग्णसेवा मिळायला हवी. याबरोबर डॉक्‍टर व रुग्ण यांच्यातील सुसंवाद व विश्‍वास हा कसा वाढवता येईल, या दृष्टीने दोघांनीही सजगता बाळली पाहिजे.
- डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपाधिष्ठाता, एमजीएम रुग्णालय, औरंगाबाद

वैद्यकीय क्षेत्र प्रगती करतेय. त्यामुळे अचूक निदान शक्‍य झाले आहे. प्रत्येक डॉक्‍टर रुग्ण बरा होण्यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येकवेळी यश मिळेल असे नसते. त्यामुळे परिस्थिती समजून रुग्ण व नातेवाइकांनी वास्तविक अपेक्षा ठेवाव्यात. चांगली रुग्णसेवा मिळावी, हा प्रत्येकाचा हक्कच आहे.
- डॉ. अनुपम टाकळकर, सहसचिव, आयएमए, औरंगाबाद

Web Title: World Patient Day Doctor Patient Discussion Trust