पारंपरिक शिक्षणाला फाटा देत मिळवले रोजगाराचे कौशल्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.

औरंगाबाद - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या बावीस पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन अवघ्या तीन महिन्यांत महागडी यंत्रे चालवण्याची कला अगदी मोफत मिळाली. औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरसह तीन अन्य संस्थांनी एकत्र येत हे करून दाखवले. औद्योगिक संघटनेने पुढाकार घेऊन हा प्रयोग यशस्वी करण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे.

औरंगाबादेतील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (सीएमआयए), पोलिस वेल्फेअर विभाग, मराठवाडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी), जीआयझेड या संस्थांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकत्र येत ही किमया साधली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या अशा शंभरातून 22 पोलिस पाल्यांना या संस्थांनी निवडले. विशेष म्हणजे यात पाच मुलींचा समावेश आहे.

राज्यात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांपेक्षाही सरस असे तीन महिन्यांचे (बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम) प्रशिक्षण या 22 पाल्यांना देत सीएमआयएने त्यांना तांत्रिक माहिती आणि यंत्रांशी मैत्री घालून दिली. हा कोर्स पूर्ण करून मार्च 2020 मध्ये मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर हे विद्यार्थी भारतासह परदेशातही नोकरीस पात्र ठरतील. जर्मनीच्या ड्यूअल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग (डीएसटी) या शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून हा अभ्यासक्रम कार्यान्वित करण्यात आला. विविध औद्योगिक संघटनांनी या मॉडेलचा अभ्यास चालवला असून, देशाच्या विविध भागांत याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे.

पैठण रोडवरील गेवराईत राहत असल्याने वाळूजला मी जाताना घरच्यांमध्ये धाकधूक होती. जिद्द कायम ठेवत पालकांची समजूत काढली. बारावी कला शाखेचे शिक्षण घेताना माझ्या हातात नोकरी आहे.
- अश्‍विनी केदारे

शिक्षण देण्यासाठी तत्पर असलेल्या, आपल्या पाल्यांसाठी काही करू इच्छिणाऱ्या संस्थांना एकत्र आणून हा प्रयोग केला. तांत्रिक कौशल्य हाती देऊन पोलिस पाल्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठीचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Skills Day Employment Education Police