जागतिक पर्यटन दिन - नर्सी नामदेव देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान

राजेश दारव्हेकर 
Sunday, 27 September 2020

संत नामदेव महाराज हे आद्यकीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायात ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पंजाबमध्ये जाऊन ऐतिहासिक कार्य केले. शिखधर्मीयांचा पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या दोह्यांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र - पंजाबचा दुवा असलेले नर्सीचे संत नामदेव महाराज मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविकांसह पंजाबचेही भाविक नांदेडला आल्यानंतर आवर्जून दर्शनासाठी येतात. 

हिंगोली - हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील वारकरी संप्रदायाचे धर्म संस्थापक संत नामदेव महाराज यांची कीर्ती महाराष्ट्रातच नाही तर भारतात पसरली आहे. त्यांची अभंगरचना समाजोद्धारासाठी असून त्यांनी सांगितलेला भक्तीचा मार्ग मानव कल्याणाच्या दिशेने नेणारा आहे. संत नामदेवांच्या जन्मस्थानाला पंजाब व महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने भाविक भेट देण्यासाठी येतात.

संत नामदेव महाराज हे आद्यकीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायात ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पंजाबमध्ये जाऊन ऐतिहासिक कार्य केले. शिखधर्मीयांचा पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या दोह्यांचा समावेश आहे. त्यामुळे पंजाबमधील भाविकांनी या ठिकाणी भगत शिरोमणी नामदेव यांच्या नावाने गुरुद्वारादेखील उभारला आहे. त्यामुळे पंजाबसह देशभरातून येणारे शीख भाविक अगोदर संत नामदेव महाराज यांच्या मूळ घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतात. त्यानंतर संत नामदेव महाराज यांच्या मंदिराकडे दर्शनासाठी जातात. 

हेही वाचा - नांदेड - लॉकडाउननंतर ‘कोरोना’चा खासगी ‘डोस’ सोसेना

संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा 
आषाढी व कार्तिकी एकादशी, संत नामदेव परतवारी सोहळा साजरा करण्यासाठी तसेच मंदिरात जयंतीसाठी हजारो भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. होळीनंतर येणाऱ्या पापमोचनी एकादशीला येथे यात्रा भरते. ही यात्रा मिठाची यात्रा म्हणून परिचित आहे. मागच्या पंचवीस वर्षांपासून संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा आषाढीनिमित्त पंढरपूर येथे जातो. या पालखीचे पहिले रिंगण हिंगोलीत, दुसरे अंबेजोगाई तर तिसरे रिंगण जवळबन येथे होते. 
 
हेही वाचलेच पाहिजे - महिला रुग्णांसाठी गुड न्यूज : कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड

नियोजित आराखडा तयार; पण निधी नाही 
राज्य शासनाने पर्यटकांसाठी आठ मजली राष्ट्रीय संत स्मारकाचा नियोजित आराखडा तयार केला; मात्र यासाठी अद्याप निधी मिळाला नाही. भक्तांच्या वर्गणीतून संत नामदेव मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आहे. शासनाने संत नामदेव महाराज यांचे मूळ घर राष्ट्रीय स्मारक म्हणून १९९९ मध्ये घोषित केले आहे. आठ इमारतीचे बांधकाम या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक मजल्याला संतांची नावे देण्याचेही ठरविण्यात आले. मात्र, निधी उपलब्ध झाला नसल्याने भाविकांसाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. 

(संपादन - अभय कुळकजाईकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tourism Day - Narsi Namdev is a place of worship for devotees across the country, Hingoli news