येलदरी धरण ‘तुडूंब’

कैलास चव्हाण
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

परभणी : जिंतुर जवळील येलदरी धरणात रविवारी (ता.दहा) दुपारी चार वाजेपर्यत 97.25 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे दरवाजे शनिवारी उशीरा बंद केल्याने आवक कमी झाली आहे. परभणीसह हिंगोली नांदेडचा पाणीप्रश्न सुटला आहे. दरम्यान, येलदरी येथील विज निर्मीती प्रकल्पातून आतापर्यंत 5 लाख 26 हजार युनीट विज तयार झाली आहे.

परभणी : जिंतुर जवळील येलदरी धरणात रविवारी (ता.दहा) दुपारी चार वाजेपर्यत 97.25 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे दरवाजे शनिवारी उशीरा बंद केल्याने आवक कमी झाली आहे. परभणीसह हिंगोली नांदेडचा पाणीप्रश्न सुटला आहे. दरम्यान, येलदरी येथील विज निर्मीती प्रकल्पातून आतापर्यंत 5 लाख 26 हजार युनीट विज तयार झाली आहे.

दिवंगत माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या दुरदृष्टीतून आणि पुढाकारातून जिंतुर जवळील येलदरी येथे पूर्णा नदीवर 1958 मध्ये धरण बांधण्यास प्रारंभ होऊन 1968 मध्ये धरण पूर्ण झाले. धरणावर 10 हजार 560 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. धरणाची पाणी क्षमता 934.44 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील सिंचन आणि पाणीपपुरवठा अवलंबुन आहे. या धरणाची पाणी पातळी 461 मीटर असून या धरणात 896 दशलक्ष घनमीटर अर्थात 31 टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो.
यंदा ऑगस्ट महिण्यापर्यंत धरण मृतसाठ्यात होते. त्यानंतर सप्टेंबर अखेरीस पासून येलदरी धरणात वरच्या भागातील खडकपूर्णा धरणातील पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरण सप्टेंबर महिण्यात मृतसाठ्यातून बाहेर आले होते. ऑक्टोबर महिण्यात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने पुन्हा खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग झाला. सातत्याने पाऊस पडू लागल्याने येलदरी धरणात आवक कायम राहीली. त्यामुळे मागील 15 दिवसापासून धरणात सातत्याने पाणीपातळी वाढती राहीली आहे. सहा दिवसांपासून धरणातील विज निर्मिती प्रकल्प देखील सुरु झाला आहे. शनिवारी खडकपूर्णा धरणाचे दरवाजे बंद केल्याने  पाण्याची आवक मंदावली आहे.

रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत येलदरी धरणात 97.24 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या धरणात जिवंत पाणीसाठ 786.956 दशलक्ष घनमिटर एवढा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने या धरणावर सुरू असलेली वीज निर्मिती देखील गेल्या सहा दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने पुढील बाजूस असलेले सिध्देश्वर धरण देखील  भरत चालले आहे. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागाचा  पाणी प्रश्न मिटणार आहे. यापूर्वी येलदरी धरण 2006 च्या अतिवृष्टीत तुडुंब भरले होते. त्यानंतर 2013 ला झालेल्या जोरदार पावसात या धरणात 70 टक्के साठा उपलब्ध झाला होता. त्यानंतर आता 2019 साली हे धरण भरले असून यामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड, पूर्णा, जिंतुर या शहरांचा पाणी प्रश्न मिटलेला असून सिंचनालाही मोठा लाभ होणार आहे.

  या भागात वाढणार सिंचन

औंढा, वसमत, पूर्णा, नांदेड या भागात येलदरी खालोखाली सिध्देश्वर धरणातून कालवे आहेत. तर जिंतुरच्या काही भागात उपसा सिंचन पध्दतीने पाणी घेतले जाते.

 खडकपूर्णाचा अडथळा

पूर्वी दरवर्षी भरणाऱ्या येलदरी धरणात बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण झाले तेव्हापासून अत्यल्प साठा राहत आहे. खडकपूर्णा भरले तरच येलदरीत पाणी येत असल्याने मागील पाच वर्ष धरण 50 टक्याच्या पुढे गेले नव्हते. खडकपूर्णा धरणाला मराठवाड्यातून विरोध असतानाही विदर्भातील नेतृवाने ते धरण उभे केले. त्यामुळे येलदरी पाणलोट क्षेत्रातून येणारी आवक खडकपूर्णात अडकत आहे.
.....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yaldari dam 'trumpet'