महिला होणार यंदा संमेलनाध्यक्ष 

महिला होणार यंदा संमेलनाध्यक्ष 

लातूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्ञानपीठप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यापासून कविवर्य ना. धों. महानोर यांच्यापर्यंत वेगवेगळी नावे पुढे येत असली, तरी संमेलनाध्यक्षपदाचा पहिला सन्मान महिलेलाच मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर आणि कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची नावे साहित्य महामंडळाकडे आली आहेत. यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकप्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ यंदापासून संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करणार आहे. तसा बदल महामंडळाने आपल्या घटनेत केला आहे. त्यानुसार महामंडळाने संलग्न, समाविष्ट असलेल्या सर्व साहित्य संस्थांना अध्यक्षपदासाठी नावे सुचवा, असे पत्र पाठवले होते. त्यानुसार त्या-त्या साहित्य संस्थांनी अध्यक्षपदासाठी नावे सुचवली आहेत. त्यात नेमाडे, महानोर, गणोरकर, ढेरे यांच्यासह नाटककार प्रेमानंद गज्वी, रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे. महामंडळाने ही नावे अद्याप गोपनीय ठेवली आहेत. 

नेमाडे यांनी यापूर्वी "साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे,' अशा शब्दांत संमेलनावर टीका केली होती. त्यामुळे ते संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा आतापासूनच साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे. महानोर यांनीही अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आलेल्या इतर साहित्यिकांचा अपमान होईल, असे कारण पुढे केले आहे. त्यामुळे तेही अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे मराठवाडा साहित्य परिषदेने घटनादुरुस्तीच अपूर्ण आहे, असे कारण सांगून अध्यक्षपदासाठी पाठवलेली नावे मागे घेतली आहेत. या निवड प्रक्रियेत यंदा तटस्थ राहण्याचा मराठवाडा साहित्य परिषदेने निर्णय घेतला आहे. 

संमेलनाध्यक्षपदासाठी सर्व प्राप्त नावे ही साहित्य महामंडळाच्या सभेसमोर ठेवली जातील. महामंडळाची 28 ऑक्‍टोबर रोजी ही सभा होणार आहे. त्यात अंतिम निर्णय होईल. 
- डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ 

चारच महिला झाल्या अध्यक्ष 
साहित्य महामंडळाचे आजवर 91 साहित्य संमेलने झाली. यापैकी चारच संमेलनांच्या अध्यक्षपदाचा मान महिलेला मिळाला आहे. यात कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (कऱ्हाड), शांता शेळके (आळंदी) आणि विजया राजाध्यक्ष (इंदूर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या अठरा वर्षांत एकाही महिलेला हा मान मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com