नऊ लाख भाविकांनी वेचली चुनखडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

येरमाळा येथे येडेश्‍वरी देवीच्या यात्रोत्सवात "आई राजा उदो'चा गजर
येरमाळा - 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात सुमारे नऊ लाख भाविकांनी बुधवारी (ता. 12) येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुनखडी वेचली. चुनखडीच्या रानात देवीची पालखी आल्यानंतर भाविकांनी चुनखडी वेचण्यासाठी गर्दी केली होती.

येरमाळा येथे येडेश्‍वरी देवीच्या यात्रोत्सवात "आई राजा उदो'चा गजर
येरमाळा - 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात सुमारे नऊ लाख भाविकांनी बुधवारी (ता. 12) येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुनखडी वेचली. चुनखडीच्या रानात देवीची पालखी आल्यानंतर भाविकांनी चुनखडी वेचण्यासाठी गर्दी केली होती.

चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 12) सकाळी येडेश्‍वरी देवीची पंचोपचार आरती झाल्यानंतर आठच्या सुमारास मान्यवर व लाखो भाविकांच्या उपस्थितीत येडेश्‍वरी देवीच्या पालखीचे मुख्य मंदिरातून आंबराई येथे पाच दिवसांच्या मुक्कामासाठी प्रस्थान झाले. रस्त्याच्या दुतर्फा पालखी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. सकाळी सव्वादहाच्या सुमारास पालखी येरमाळा गावात पोचली. पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी फुलांनी रस्ता सजविलेला होता.

येरमाळा गावातील बाजार चौकात पालखी आल्यानंतर दर्शनासाठी एकच गर्दी झाली. माढेकर चौकात पालखी आल्यानंतर तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मदन बारकुल, सरपंच विकास बारकुल, पंचात समितीचे उपसभापती भगवान ओव्हाळ आदींनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी अकराला चुनखडीच्या रानात पालखीचे आगमन झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक या ठिकाणी एकत्रित झाले होते. येथील मुख्य ठिकाणास पालखी प्रदक्षिणा झाली. या वेळी "आई राजा उदो उदो'चा गरजर करीत भाविकांनी नैवेद्य, चुनखडीची पालखीवर उधळण केली. त्यानंतर पालखीचे आंबराई मंदिराकडे प्रस्थान झाले.

वाहतुकीची मोठी कोंडी
गेल्यावर्षीच्या यात्रेतील नियोजनाला बगल देऊन पोलिस प्रशासनातर्फे यंदा नव्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. असे असले तरी यंदाही सुमारे दोन तासांपेक्षाही अधिक वेळ वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. यावर्षी महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असून याचाही परिणाम या कोंडीवर जाणवला. दोन्ही बाजूंनी नवीन रस्ता सुरू केलेला असला तरीही वाहतुकीची कोंडी झालीच. मुख्य बसस्थानक परिसर, गावातील प्रमुख रस्ते, सोलापूर रोड, कळंब रोड, बार्शी रोड, औरंगाबाद रोडवरही सुमारे दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: yedeshwari devi yatrotsav