‘येलदरी’ ८७ टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

 बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पूर्णा नदीत होत असलेल्या विसर्गाने येलदरी (ता. जिंतूर) धरण सोमवारी सकाळी सातपर्यंत ८७ टक्के भरले. दुपारी बारा वाजता एक दरवाजा काही वेळासाठी उघडून तो बंद करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

जिंतूर (जि. परभणी) - बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पूर्णा नदीत होत असलेल्या विसर्गाने येलदरी (ता. जिंतूर) धरण सोमवारी सकाळी सातपर्यंत ८७ टक्के भरले. दुपारी बारा वाजता एक दरवाजा काही वेळासाठी उघडून तो बंद करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.

जिंतूरजवळील येलदरी हे जायकवाडीनंतरचे मोठे धरण आहे. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील पाणीपुरवठा, सिंचन या धरणावर अवलंबून आहे. गेल्या दहा वर्षांत एकदाही ते ५० टक्‍क्‍यांच्या वर गेले नव्हते. यंदा मात्र अवकाळी पावसाने कमाल केली. वीस दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडणारा पाऊस, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्ण धरणातून होत असलेला विसर्ग आदींमुळे येलदरीची पातळी वाढत गेली. आज सकाळी सातपर्यंत धरणात ६९९६.९२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, त्याची टक्केवारी ८७ एवढी आहे. आवक अशीच सुरू राहिल्यास धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. तसे झाल्यास पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्‍यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांनी जनावरे, मालमत्ता अन्यत्र हलवून सावध राहावे, असा इशारा येलदरी पूर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आला आहे. 

येलदरीतील वीजनिर्मिती प्रकल्पातील दोन संच सुरू करण्यात आले. त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yeldari dam 87 percentage full