esakal | ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’चा घरोघरी जयघोष 
sakal

बोलून बातमी शोधा

04july

परभणी जिल्ह्यात चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी खंडोबाचे पूजन करून ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’च्या जयघोषात तळी उचलण्यात आली. 

‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’चा घरोघरी जयघोष 

sakal_logo
By
गणेश पांडे

जिंतूर ः चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी खंडोबाचे पूजन करून ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’च्या जयघोषात तळी उचलण्यात आली. शहरात कसबापेठेत श्री खंडोबाचे एकमेव मंदिर आहे. भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता येथील खंडेरायाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. 

चातुर्मासात वर्ज्य असलेले कांदवांगे या दिवशीपासून खाण्याला सुरुवात झाली. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत अनेक भाविक चंपाषष्ठीचे अर्थात खंडोबाचे सहा दिवसांचे नवरात्र पाळतात. आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतायुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले सात कोटी येळकोट सैन्याद्वारे राक्षसांचा वध केला. तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते, अशी अख्यायिका आहे. 

परभणीतील खंडोबा यात्रेवर देखील कोरोनाचे सावट 
परभणी : परभणीचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबा यांच्या यात्रेवर देखील कोरोनाचे संकट राहिले. रविवारी (ता.२०) महापालिकेच्यावतीने श्री खंडोबाचे पूजन करण्यात आले. दरवर्षी चंपाषष्ठीनिमित्त परभणीचे ग्रामदैवत श्री खंडोबा यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या वतीने तसेच खंडोबा यात्रा पंच कमिटीच्या वतीने विविध संस्कृती कार्यक्रमांचे तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुष्टियुद्ध व कुस्ती स्पर्धा देखील रंगल्या होत्या. आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात शेकडोच्या संख्येने खेळाडू सहभागी होत असत. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात परभणीकर देखील मोठ्या हिरीरीने भाग घेत असत. परंतू, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या. रविवारी नागरिकांनी आपल्या दैवताचे कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेतले. महापालिकेच्या वतीने उपमहापौर भगवान वाघमारे, मारोती बनसोडे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक सुनिल देशमुख, माजी सभापती रविंद्र सोनकांबळे, माजी सभापती अरविंद देशमुख, दत्ता ढाकरगे, गणेश मिरासे, रमेश देशमुख, संजय वाळवंटे, गोविंद देशमुख, प्रसिध्दीप्रमुख राजकुमार जाधव, विलास भुसारे आदींनी पूजाअर्चा करून दर्शन घेतले. 

हेही वाचा - उमरगा : सरपंचपदच ‘क्वारंटाईन’ झाल्याने इच्छूक ‘आयसीयू’मध्ये! -

फुलकळसमध्ये चंपाषष्ठीनिमित्त वारूच्या सभीणाने लक्ष वेधले 
ताडकळस ः फुलकळस (ता.पुर्णा) येथे खंडोबाचा जयघोष, तळी ऊचलत शिवमल्हार येळकोट येळकोट म्हणत मंदिरासमोर सभिणा पाहण्याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. खोबरे, भंडारा, झेंडुच्या फुलाचे हार गळ्यात घालुन हालकीवर ठेका धरत गल्लीबोळात मिरवत सभीणा काढण्यात आला. या वेळी लिंबाजी गंलाडे, साधोजी मिसाळ, धन्यकुमार शिवणकर, विकास गव्हाळे, उमाजी गंलाडे, ज्ञानोबा दुधगोडे आदींनी पुढाकार घेतला होता.  

हेही वाचा - घराचा दरवाजा बंद केला अन् प्लास्टिक टाकीत स्वतःला बुडवून तरुणाची आत्महत्या -

जवळा येथील यात्रा महोत्सव साधेपणाने साजरा 
 देवगावफाटा : सेलू तालुक्यातील जवळा येथे श्री जिवाजी महाराज देवस्थानचा चंपाषष्टीमित्त दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा यात्रा महोत्सव यंदा मात्र कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने एक आगळा वेगळा ठरला. मंदिरात सुगंधासह सॅनिटायझरचा उग्र गंध दरवळत असतानाच दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी नियमांचे पालन करीत श्री जिवाजी महाराजांचा यात्रा महोत्सव साधेपणाने साजरा केला. 
यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णय घेत सर्व यात्रा रद्द केल्यामुळे काही स्तरावरून या निर्णयाचे स्वागत झाले तर अनेक भक्तांमध्ये नाराजीही दिसून आली. दरवर्षी चंपाषष्टीमित्त भरणाऱ्या जवळा येथील यात्रेत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी या आनंदावर विरजन पडले. यात्रेच्या दिवशी जवळा येथे येणाऱ्या सर्व भाविकांनी सावधता व दक्षता घेत दर्शन घेतले. बहुतेक भाविक मास्क घालून व सुरक्षित अंतर ठेवूनच होते. दरम्यान, व्यवस्थापनाने मंदिरात सॅनिटायझरची फवारणी केल्याने प्रवेशद्वरात धूप, अगरबत्ती यांबरोरच सुगंधात अल्कोहोलचा उग्र दर्पही दरवळत होता.

 
संपादन ः राजन मंगरुळकर

loading image