औरंगाबाद : नाथसागराचे पाणी झाले हिरवे, पिवळ्या पाण्याचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

फारोळा येथील जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद - शहरात दोन दिवसांपासून नळाला पिवळे पाणी येत असून, जल शुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा दावा केला जात असला तरी नाथ सागरातील पाणीसाठाच हिरवा झाल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, फारोळा येथील जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, केमिकलचे डोस वाढविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागराने गतवर्षीच्या भीषण दुष्काळात तळ गाठला होता. जुलै महिन्यापर्यंत महापालिकेला मृत साठ्यातून पाणी घ्यावे लागले; मात्र नाशिकसह परिसरात झालेल्या पावसाने गोदावरी नदीला पूर आला व अवघ्या काही दिवसात नाथसागर काठोकाठ भरला. डाव्या-उजव्या कालव्यासह काही प्रमाणात मुख्य दरवाजे उघडून नदीत पाणीही सोडण्यात आले. नाथसागरातील पाण्याची आवक थांबल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाथसागरातील पाणीसाठा वाढल्यामुळे महापालिकेची चिंता मिटली असली तरी दूषित पाण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. शहरात दोन दिवसांपासून नळाला पिवळे पाणी येत असून, हे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन नगरसेवकांतर्फे केले जात आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाथसागरातील पाणीच हिरवे झाले आहे. त्यामुळे फारोळा येथील जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी केमिकल, त्रुटीचे डोस वाढवून काळजी घेतली जात असल्याचे सांगितले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र पाणी गढूळ असल्याचे सांगितले. 
 
बिघाड झाल्याचा दावा 
दोन दिवसांपासून नळाला पिवळे पाणी येत आहे. त्यामुळे नगरसेवकांनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे; मात्र महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड आल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे. 
  
कंपनीच्या दूषित पाण्याचा फटका 
वाळूज परिसरातील अनेक कंपन्यांचे पाणी खामनदीपात्राद्वारे नाथसागरात जाते. तसेच नाशिकसह इतर भागातून एखाद्या कंपनीने दूषित पाणी नदीपात्रात सोडले असावे, त्यामुळेच पाण्याचा रंग बदलला असल्याचे बोलले जात आहे. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे दिवसभर जायकवाडी येथे ठाण मांडून होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yellow water supply in Aurangabad