येमेनच्या युवतीचे खुबा प्रत्यारोपण यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - येनेममध्ये अठरा वर्षांपूर्वी स्टेजवरून पडलेल्या मुलीच्या खुब्यावर उपचार होऊ शकले नाही म्हणून खुब्याचे एकसंध हाडात रूपांतर झाले. त्यामुळे तिला आधाराशिवाय चालणे शक्‍य नव्हते. त्या खुब्याच्या प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया एमजीएममध्ये यशस्वी झाली. त्यामुळे २८ वर्षीय अमल मोहम्मद रागेह स्वतःच्या पायावर चालू शकली. त्याचा अपरिमित आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

येनेम येथील मध्यमवर्गीय परिवारातील अमल दहा वर्षांची असताना एका उंच स्टेजवरून पडली होती. त्यावेळी तिचा खुबा डॅमेज झाला. त्यावेळी उपचार न झाल्याने गेल्या अठरा वर्षांत त्याचे रूपांतर एकसंध हाडात झाले. त्यामुळे तिला तिचा डावा पाय वाकविता येत नव्हता. नैसर्गिक विधीही करणे अवघड होते. येमेनच्या शंभराहून अधिक रुग्णांवर येथे यशस्वी उपचार झाल्याने नातेवाइकांसह तिने एमजीएम गाठले. तीन महिन्यांपूर्वी निदानानंतर अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. गिरीश गाडेकर यांनी ऑपरेशननंतरच्या शक्‍यतांची जाणीव रुग्ण व नातेवाइकांना करून दिली. 

रुग्णांनी शस्त्रक्रियेला होकार दिल्याने तीन महिन्यांपूर्वी गुंतागुंतीची चार तासांची ड्युअल मोबिलिटी हिप जॉइंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया केली. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर वाकड्या झालेल्या हाडांची दोन तासांची शस्त्रक्रिया केली. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. स्नायूंचाही प्रतिसाद मिळाल्यानंतर या शस्त्रक्रियेची माहिती डॉ. गिरीश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या दोन दिवसांत अमल येमेनला परतणार असल्याचेही ते म्हणाले. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन काथार यांच्यासह रुग्णांच्या नातेवाइकांची उपस्थिती होती. 

शंभरावर लोकांच्या शस्त्रक्रिया 
येमेन राष्ट्र गेल्या सहा ते सात वर्षांपासून युद्धजन्य परिस्थितीत आहे. त्यामुळे तेथे वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. गेल्या सहा वर्षांत तेथील शंभराहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया एमजीएमच्या अस्थिरोग विभागात करण्यात आल्या असल्याचे डॉ. गाडेकर म्हणाले.

Web Title: Yemen girl surgery is successful