हो, भारतात अघोषित आणिबाणी आहे- नयनतारा सहगल

हो, भारतात अघोषित आणिबाणी आहे- नयनतारा सहगल

लातूर : आणीबाणीच्या वेळी मी आवाज उठवला होता. त्यावेळी माझा विरोध हा कोण्या व्यक्तीला किंवा पक्षाला नव्हता. लिहिण्या-बोलण्यावर बंधने आली होती म्हणून केलेला तो विरोध होता. आजही भारतात नेमकी तीच स्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी सरकारवर टीका केली. राजकीय दबाव टाकून आयोजकांच्या माध्यमातून माझ्यावर बॅन आणले जात आहे. पण भारतात अशी मी एकटी नाही. अनेकातली एक आहे, असेही त्या म्हणाल्या.

यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारयीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन सहगल यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांच्या नावाला विरोध झाल्याने आयोजकांनी ई-मेल पाठवून सहगल यांना संमेलनाला येऊ नका, असे सांगितले. या निमंत्रणवापसी वरून आयोजक आणि महामंडळावर चौफेर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, 'सकाळ'ने सहगल यांच्याशी संवाद साधला. या वेळी साहित्य संमेनवरून सध्या सुरु असलेल्या वादाबाबत त्यांनी परखड मते व्यक्त केली.

सहगल म्हणाल्या, मी आणीबाणीला विरोध केला होता. हे नव्या पिढीला माहिती नसेल. पण माझा विरोध हा कोणा एकाला नव्हता. आजही माझा विरोध हा कोण्या व्यक्तीला किंवा पक्षाला नाही. हुकूमशाही वृत्तीला आहे. ती सध्या वाढत आहे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. कारण आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत. आपल्याला लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. नेमके तेच स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. आणीबाणीच्या वेळीही हेच झाले होते.

पुरस्कार वापसी हे कारण
लोकशाही देशात आपण तानाशाही का खपवून घ्यायची, असा सवाल उपस्थित करून त्या म्हणाल्या, "माझे निमंत्रण आयोजकांनी स्वतःहून रद्द केले होते. आता त्यांचा विरोध मावळला असला तरी मी संमेलनाला येऊ शकत नाही. आयोजकांनी राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतला होता, हे उघड आहे. माझे लेखन, माझे विचार, मी केलेली पुरस्कार वापसी ही कारणे असू शकतात. पण माझ्या भूमिकेला महाराष्ट्रातील अनेक लेखक, कलावंतांनी पाठींबा दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत ते बोलले, याचे मला वेगळेच समाधान आहे.

लेखक, कलावंत गप्प नाहीत
साहित्य संमेलनातील माझ्या उपस्थितीवरच नव्हे तर गायक टी. एम. कृष्णा यांच्या मैफलीवर बंदी आणण्यात आली. पुण्यातही एका लेखकाला साहित्य संमेलनाला येऊ दिले गेले नाही. अशा घटना वारंवार घडत आहेत. म्हणून लेखक, कलावंत गप्प आहेत, असे नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून विरोधाचा आवाज उमटत आहे. तो दिवसेंदिवस वाढतही आहे. यात शेतकरी, विद्यार्थी, प्राध्यापक, इतिहास अभ्यासक यांचाही आवाज मिसळत आहे. विषेश म्हणजे, अहिंसा मार्गाने, शांततापूर्ण वातावरण ठेवत हा विरोध होत आहे, असेही त्या म्हणाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com