समाजकार्य महाविद्यालयात "यिन' निवडणुकीचा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

जालना - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांत निवडणुका घेण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी (ता.27) पाच महाविद्यालयांमध्ये होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जालना - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांत निवडणुका घेण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी (ता.27) पाच महाविद्यालयांमध्ये होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील 25 महाविद्यालयांतील शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांच्याकडून कोणत्या विषयावर काम करण्याची गरज आहे, हे जाणून घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील लोकप्रतिनिधींसोबत नियमित बैठका, वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौरे करण्यात येणार आहेत. युवकांच्या सामाजिक परिषदेत सहभाग या उपक्रमाचा यात समावेश राहील. याच निवडलेल्या प्रतिनिधींमधून जिल्हा, विभाग आणि राज्याचा अध्यक्ष यांच्या निवडीनंतर त्यांच्यातील मोजक्‍या व नेतृत्व गुण असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री, शॅडो मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकते. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठीची जोरदार तयारी विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. काही महाविद्यालयांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. समाजकार्य महाविद्यालय रामनगर, जिजाऊ महाविद्यालय, टेंभुर्णी, कृषी महाविद्यालय खरपुडी, गोदावरी महाविद्यालय, सी. पी. भक्त महाविद्यालयात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे.
रामनगर येथील समाजकार्य महाविद्यालयात निवडणुकीचा उत्साह दिसून आला. सोशल मीडिया, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार पूर्ण केला. "यिन'च्या निवडणुकीविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, प्रा. डॉ. रेणुका भावसार, प्रा. डॉ. दीपक बुख्तरे, प्रा. नरसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

"यिन'च्या निवडणुकीद्वारे सध्या जी राजकीय परिस्थिती आहे त्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे. भविष्यात कुशल राजकीय नेतृत्व निर्माण होण्यासही यातून मोठी मदत होणार आहे. या निवडणुकीसाठी युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आजची युवा पिढी ही देशात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी निश्‍चितच पुढाकार घेईल. या उपक्रमाद्वारे तरुणांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्षमता वाढविण्याचे कार्य होत आहे.
-प्रा. डॉ. रेणुका भावसार "यिन' निवडणूक अधिकारी, समाजकार्य महाविद्यालय, रामनगर

Web Title: YIN election in jalna