मोबाईलचा स्फोट होण्यास आपणच जबाबदार 

संदीप लांडगे
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

योग्य काळजी हीच सुरक्षितता

औरंगाबाद - मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे; परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे बॅटरीचा स्फोट होण्यांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज अशा घटना आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळतात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे; तर काहींना अपंगत्व आले आहे. काही ठिकाणी घर किंवा प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

कशामुळे घडतात घटना? 
 अनेकांना मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून झोपण्याची सवय आहे. मात्र हा प्रकार धोकादायक आहे. अशा प्रकारामुळे अनेक ठिकाणी चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. पॅंटच्या खिशात फोन ठेवल्याने शरीराच्या उष्णतमुळे तसेच चालल्यामुळे झालेले पॅंट आणि मोबाईलचे घर्षण यामुळे फोन गरम होतो. तसेच तासन्‌तास फोनवर बोलणे, गेम खेळणे, सतत इंटरनेट चालू ठेवणे, हलक्‍या प्रतीची बॅटरी वापरणे, उन्हात फोन ठेवणे अशा कारणांमुळे मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. 

चार्जिंग करताना काय काळजी घ्यावी? 
- मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्याने ओव्हरहिट अर्थात अतिगरम होतो त्यामुळे स्फोट होण्याची शक्‍यता असते. 
- नेहमी मोबाईल ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचा चार्जर वापरावा. अन्य चार्जरच्या वापरामुळे फोन हळूहळू चार्ज होतोच; तसेच बॅटरीलाही धोका असतो. 
- फोन चार्जिंगला लावलेला असताना फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकरफोन ऑन करूनही बोलू नका. शिवाय चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडिओ बघणे किंवा गेम खेळणेही टाळा. 
- चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल गरम होत असेल, तर संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. 
- मोबाईल 80 किंवा 90 टक्केच चार्ज आहे; म्हणून पुन्हा चार्जिंगला लावून ठेवू नका. 
- बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी वीस दिवसांतून एकदा पूर्णत: बॅटरी डिस्चार्ज होऊ द्या, त्यानंतर पूर्ण चार्ज करा. 
- आवश्‍यकता नसेल तेव्हा शक्‍यतो मोबाईल बंद करून ठेवा. (उदा ः मीटिंग, झोपणे, ट्रॅकिंग) त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाया जाणार नाही. 
- मोबाईल व्हायब्रेशनऐवजी रिंगटोन मोडवर ठेवा, त्यामुळे बॅटरी बराच वेळ टिकते. 
- ब्लू टूथ, जीपीएस, वायफाय, इंटरनेट विनाकारण चालू ठेवू नका. तसेच ऍनिमेशन्स थीम किंवा लाईव्ह वॉलपेपर स्क्रीनवर ठेवू नका, त्यामुळे बॅटरी जलद उतरते. 

शासनाकडून उपाययोजना 
मोबाईलचा स्फोट का होतो? याची कारणे शोधण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मोबाईलमध्ये लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर अशा दोन प्रकारच्या बॅटरी वापरल्या जातात. सरकारनं मोबाईल फोनसाठी आता बीआयएस मान्यता अनिवार्य केली आहे. यामुळे आता सरकारी प्रयोगशाळेमध्ये मोबाईल आणि बॅटरी यांची टेस्ट होते. जी प्रयोगशाळा आयएसआय मार्क देते त्या प्रयोगशाळेत या मोबाईल आणि बॅटरीची टेस्ट केली जाते. 

जुने ते जुनेच ..
अनेक दुकानात जुने मोबाईल दुरुस्त करून किंवा हलक्‍या कंपनीचे मोबाईल स्वस्तात विकले जातात. या मोबाईलमधील बॅटरीदेखील त्याच दर्जाच्या असतात. मोबाईल बॅटरीत लिथियम पॉलिमर आणि लिथियम आयन यांचा प्रचंड पॉवरचा साठा असतो. ही पॉवर एखाद्या स्फोटकासारखी असते. जास्त वेळ चार्जिंग, तासंतास फोनवर बोलणे, गेम खेळणे, शरीराच्या उष्णतेमुळे मोबाईल प्रचंड गरम होतात. परिणामी त्यांचा स्फोट होतो. 

मोबाईलचा स्फोट होण्यापूर्वी हे बदल 
- दोन मिनिटांच्या वर बोलल्यानंतर मोबाईल प्रचंड गरम होणे. 
- बॅटरी फुगली असेल तर फोनचे बॅक पॅनल बाहेर येते; अशा स्थितीत 
बॅटरी फुटण्याची शक्‍यता अधिक असते. 
- फोन वारंवार पडल्यानेही बॅटरी डॅमेज होते, त्यामुळेही स्फोट होतो. 
 
 ही घ्या काळजी 
- फोन नेहमी कमी तापमानातच चार्ज करा; कारण चार्जिंग होत असताना फोन थोडा गरम होतो. फ्रीजवर फोन ठेवून कधीही चार्ज करू नका. रूम टेंपरेचरवर फोन चार्ज करा. 
- फोन पाण्यात पडल्यास स्वतःच तो दुरुस्त करणे टाळा. कारण फोन पाण्यात पडल्याने फोनच्या अनेक समस्या उद्भवतात. बॅटरीत शॉर्टसर्किट होऊ शकते. त्यामुळे अशावेळी फोन चार्ज करणे टाळा. स्फोट होण्याची शक्‍यता असते. 
 
बॅटरीबद्दल महत्त्वाचे 
उष्णतेचा प्रभाव अधिक पडल्याने बॅटरी फुटण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे चार्जिंग करत असताना ग्राफिकल गेम्स खेळू नका. त्यामुळे तापमान वाढलेल्या बॅटरीला नुकसान पोचते. हळूहळू बॅटरीवर परिणाम होऊ लागतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You are responsible for the explosion of mobile phones