शेतकरी कुटुंबांतील युवकाची प्राचार्यपदापर्यंत मजल 

latur
latur

लातूर : तासिका तत्वावरील जागेवरील प्राध्यापक पदाच्या मुलाखतीसाठी एकेवीस वर्षापूर्वी ते पहिल्यांदाच लातूरला आले. शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची भव्य इमारत तसेच विस्तीर्ण रूप पाहून ते क्षणभर चक्रावून गेले इथे आपला निभाव लागेल की नाही, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या त्यांच्यातील उमेदीने या विचारावर मात केली. ही उमेद, ध्येय, जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावरच मंगळवारी (ता. 21) शेतकरी कुटुंबांतील डॉ. महादेव गव्हाणे हे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत.

डॉ. गव्हाणे यांचा हा थक्का करणारा प्रवास अपयशाने खचून जाणाऱ्यांसह सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. मराठवाड्यातील पहिल्या स्वायत्त तसेच दहावी व बारावी परीक्षेत राज्यात शिक्षणाचा लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्यपद वयाच्या 45 व्या वर्षी गुणवत्तेने मिळवणारे ते पहिले प्राचार्य ठरले आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या क्षेत्रात सर्वात कमी वयात महाविद्यालयाचे प्राचार्यपद मिळणारे डॉ. गव्हाणे हे पहिले प्राचार्य आहेत. बोरगाव (बु. ता. केज. जि. बीड) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. गव्हाणे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर आपला मुलगा शिकून सवरून मोठा होईल, या आशेने त्यांच्या आईवडीलांनी त्यांना येडशी (ता. उस्मानाबाद) येथील जगदाळे मामांच्या जनता विद्यालयात प्रवेश दिला. मात्र, डॉ. गव्हाणे दहावीत त्यांना अपयश आले. यामुळे त्यांना परत गावी यावे लागले. वडील व भावासोबत शेतात राबावे लागले. प्रसंगी जनावरेही राखावी लागले.

दहावीतील अपयशाचा त्यांना मोठा खेद वाटला. जीवनात यश मिळवून विशिष्य उंचीवर जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, या विचाराने उचल खाल्ली. तेथून त्यांनी अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली. अपयशावर जिद्द व चिकाटीने मात करत अकरावीला कळंबच्या (जि. उस्मानाबाद) मोहेकर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावी व बारावीनंतर कला शाखेची पदवी (बी. ए.) त्यांनी याच महाविद्यालयात घेतली. प्रत्येक वेळी ते महाविद्यायात गुणानुक्रमे प्रथम आले. तेथून त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कला शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला (एम. ए. राज्यशास्त्र) प्रवेश घेतला. दुसऱ्याच वर्षी ते सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर एम. ए. परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले. दहावीत नापास झालेल्या या विद्यार्थ्याने विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले होते. प्राध्यापक होण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी औरंगाबादच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्यांनी बी. एड.चे शिक्षण घेतले.

राजर्षी शाहू महाविद्यालयात तासिका तत्वावर प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार होती. त्यासाठी डॉ. गव्हाणे पहिल्यांदाच 1997 मध्ये लातूरला आले. महाविद्यालयाची भव्य इमारत पाहूनच त्यांना इथे आपला निभाव लागणार नाही, हा विचार मनात दरवळून गेला. मात्र, आत्मविश्वासाने मुलाखत दिली आणि माझी निवड झाली. तासिका तत्वावर वर्षभर काम केल्यानंतर राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी राज्यशास्ज्ञ विषयात `भारत पाकीस्तान संबंध : विशेष संदर्भ काश्मीर प्रश्न` या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. त्यास मान्यता देऊन विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. पदवी बहाल केली. संशोधनासाठी त्यांनी काही दिवस काश्मीरमध्ये मुक्कामही केला.
 

सन 2015 पासून त्यांची उपप्राचार्यपदी निवड झाली. या पदावर काम करताना त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विविद उपक्रम राबवले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांनी महाविद्यालयात कार्यक्रम घेतले. त्यांच्या काळात महाविद्यालयाला स्वायत्त (अॅटॉनॉमस) दर्जा मिळण्यासोबत नॅक समितीकडूनही सर्वोत्कृष्ट मानांकन मिळाले. याचा आधार घेऊन महाविद्यालयात त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला. सात दिवस चोवीस तास त्यांनी महाविद्यालयात समर्पणाच्या भावनेतून काम केले. गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मोठी मदत केली. त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन गेलेला विद्यार्थी रिकाम्या हाताने परतला नाही. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल करून निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी बळ दिले. यामुळेच प्राचार्य डॉ. एस. डी. साळुंके यांच्या सेवानिवृत्तीनंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी ही चर्चा खरी ठरली आणि छत्रपती शाहू शिक्षण संस्थेने त्यांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड केली. प्राचार्य डॉ. गव्हाणे यांचा हा प्रवास सर्वांनाच विशेषत: नापास विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
  
मराठवाड्यातील पहिल्या स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी देऊन संस्थेने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. हे पद म्हणजे मोठी जबाबदारी असून मला ते स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे. एकेवीस वर्षापूर्वी महाविद्यालयात आल्यानंतर मला इथे आपला निभाव लागणार नाही, असे वाटले होते. मात्र, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे मला प्राचार्यपदापर्यंत पोहचता आले. महाविद्यालयाला वेगळ्या उंचीवर नेताना प्रत्येक विद्यार्थ्याला स्वावलंबी करण्यावर माझा भर राहणार आहे.
- डॉ. महादेव गव्हाणे, नूतन प्राचार्य, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com