नांदेड: बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

अनिता हुरसुळे असे मृत तरुणीचे नाव आहे. अनिता ही गुरुवारी सायंकाळी शौचासाठी घराबाहेर गेली असता रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही.

नांदेड - तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह गावातीलच विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कुरुळा गावात ही घटना घडली आहे. 

अनिता हुरसुळे असे मृत तरुणीचे नाव आहे. अनिता ही गुरुवारी सायंकाळी शौचासाठी घराबाहेर गेली असता रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या कुटूंबियांनी इतर नातेवाईक आणि मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र, तिचा काही थांगपत्ता लागत नसल्याने शुक्रवारी अनिताच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात अनिता बेपत्ता असल्याची तक्रार दिली. शनिवारी दुपारी गावातीलच विहिरीत अनिताचा मृतदेह आढळला. यावेळी कुटूंबियांनी अनिताचा खुन झाला असल्याचा दावा करत  मारेकऱ्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला. 

शनिवारी सायंकाळी अनिताचे शवविच्छेदन होऊन 18 तास उलटले तरी अनिताच्या कुटूंबियांनी पार्थिव ताब्यात घेतले नाही. आज सकाळपासूनच कुरुळा येथील रूग्णालय परिसरात मोठा जमाव जमला असून, कुरुळ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. अखेर कंधार पोलिसांनी दोन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केल्याने नातेवाईकांनी तब्बल 18 तासानंतर अनिताचा मृतदेह ताब्यात घेत तिच्यावर अंत्यसंस्कार केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A young girls deadbody found in kandhar taluka nanded