टपरी चालवणारा तरुण कंपनी मालक

बाळासाहेब लोणे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

विष्णू पांडुरंग लंके असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीची सध्या तीस लाखांवर उलाढाल आहे.

गंगापूर - घरी एक गुंठा जमीन नसतानाही अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर टपरी चालविणाऱ्या तरुणाने कंपनी उभारली आहे. विष्णू पांडुरंग लंके असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीची सध्या तीस लाखांवर उलाढाल आहे.

विष्णू लंके यांच्या कुटुंबीयांना टोकी बर्गिपूर (ता. गंगापूर) दुष्काळी पट्ट्यातून १९९० मध्ये स्थलांतर करावे लागले. आधी गंगापूर तालुक्‍यातील बुट्टेगावला, नंतर आपेगाव येथे ते स्थायिक झाले. विष्णू यांनी बुट्टेगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, शिल्लेगावच्या लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच आर्थिक अडचणीमुळे शिक्षक असलेले त्यांच्या बहिणीचे दीर प्रदीप शिंदे यांनी मालुंजा (ता. गंगापूर) येथे स्वत:च्या जागेत टपरी सुरू करून दिली. शाळा असताना वडील टपरी बघायचे व शाळा सुटल्यावर विष्णू तिथे थांबायचे. वर्ष २००३ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर विष्णू यांनी शासकीय आयटीआय, औरंगाबाद येथे टूल अँड डायमेकर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.
आयटीआय सुरू असतानाच मित्राच्या ओळखीने लग्नसमारंभात वाढेकरी म्हणून काम मिळाले. त्याचे शंभर रुपये मिळू लागले. २००६ मध्ये आयटीआय पूर्ण झाल्यावर विष्णू यांनी एका कंपनीत नोकरी स्वीकारली. नऊ वर्षांचा अनुभव आल्यावर २००५ मध्ये सोमनाथ काळे या मित्राच्या मदतीने डाय बनविण्याच्या कंपनीची स्थापना केली. बडोदा बॅंकेकडून कर्ज घेऊन एक यंत्र व मित्र, नातवाईक, खासगी सावकारच्या माध्यमातून पैसे उभे करून वीस लाखांची यंत्रे खरेदी केली. २०१८ मध्ये कंपनीची उलाढाल तीस लाखांवर आहे. 

स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर सातत्याने धडपड करणे अवश्‍यक आहे. घरी एक गुंठाही जमीन नसताना काहीतरी करायचे असा माझा निश्‍चय होता. मी माझ्या स्वप्नांना प्रयत्नांचे बळ दिले व यश मिळाले.  
- विष्णू लंके, तरुण उद्योजक.

Web Title: A young man created a company in aurangabad