डोंगरकड्याच्‍या युवकांचे जिल्‍हा परिषदेत पोश्टरबाज आंदोलन

मंगेश शेवाळकर
गुरुवार, 14 जून 2018

कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथे ग्रामपंचायतीने दिडशे गावकऱ्यांची घरे एकाच कुटूंबाच्‍या नावावर केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावंडे यांच्‍यासह तरुणांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

हिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथे दिडशे घरे एकाच कुटूंबाच्‍या नावावर केल्‍याप्रकरणी प्रशासनाकडून संथगतीने कारवाई सुरु असल्‍याच्‍या निषेधार्थ तरुणांनी गुरुवारी (ता. १४) जिल्‍हा परिषदेत पोश्टरबाजी केली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने उपस्‍थितांचे लक्ष वेधून घेतले होते.

कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथे ग्रामपंचायतीने दिडशे गावकऱ्यांची घरे एकाच कुटूंबाच्‍या नावावर केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्‍या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गावंडे यांच्‍यासह तरुणांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या प्रकरणात सुनावणी झाली. तसेच चौकशी देखील झाली. ग्रामपंचायत बरखास्‍त करण्यासंदर्भात जिल्‍हा परिषदेने विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे अहवाल पाठवला. विभागीय आयुक्‍त कार्यालयाने ता. ६ ऑगस्‍ट २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत बरखास्‍तीचा ठराव घेवून त्‍याचा अहवाल सादर करण्याच्‍या सूचना जिल्‍हा परिषदेला दिल्‍या. मात्र अद्यापपर्यंतही जिल्‍हा परिषदेने कुठल्‍याही प्रकारची कारवाई केली नाही.

त्‍यानंतर आज शिवाजी गावंडे, पंजाब अडकिणे, छगन अडकिणे, मधुकर अडकिणे, जगदीश अडकिणे, पराग अडकिणे, किशन अडकिणे, गजानन अडकिणे, विश्वनाथ अडकिणे, यशवंत जोगदंड, मुन्ना कदम, शुभम भालेराव, बाळासाहेब गावंडे, बंटी अडकिणे यांनी सर्वसाधारण सभेपूर्वी जिल्‍हा परिषदेत येवून भिंतींना कारवाईच्‍या मागणीचे पोष्टर लावले. शिवाय जिल्‍हा परिषद सदस्य येत असताना प्रवेशद्वारावर पुराव्याचे गठ्ठे टाकून हातात फलक घेतले. त्‍यानंतर सदस्यांना निवेदनही दिले आहे. तरुणांच्‍या पोश्टरबाज आंदोलनाची चर्चा सुरु होती.

Web Title: youth agitation in Hingoli