प्लॅस्टिकमुक्तीसाठी तरुणाचा बुलेट प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

लायन्स क्‍लब प्रिन्सचे सदस्य शैलेश कुलकर्णी हा तरुण प्लॅस्टिकमुक्तीसाठी भारतासह भूतान, नेपाळदरम्यान बुलेट प्रवासासाठी सज्ज झाला आहे. ‘से नो टू सिंगल प्लॅस्टिक यूज’ हा सामाजिक संदेश देत तो हा प्रवास करणार आहे.

भूतान, नेपाळचीही करणार सफर
परभणी - लायन्स क्‍लब प्रिन्सचे सदस्य शैलेश कुलकर्णी हा तरुण प्लॅस्टिकमुक्तीसाठी भारतासह भूतान, नेपाळदरम्यान बुलेट प्रवासासाठी सज्ज झाला आहे. ‘से नो टू सिंगल प्लॅस्टिक यूज’ हा सामाजिक संदेश देत तो हा प्रवास करणार आहे.

शैलेश कुलकर्णी याच्या या आंतरराष्ट्रीय बाईक राईडची सुरवात बुधवारपासून (ता.३०) परभणी शहरातून झाली. पुढील १५ दिवस जवळपास सात हजार किलोमीटरचा प्रवास तो बुलेटवरून करणार आहे. या प्रवासादरम्यान तो ठिकठिकाणी ‘प्लॅस्टिक वापरू नका’ हा सामाजिक संदेश देणार आहे. शैलेश परभणीतून नांदेड, वरोरा, नागपूर, सागर, झाशी, कानपूर, लखनौ, भीमदत्ता, पोखरा, काठमांडू, नेपाळ, सिलीगुडी, गंगटोक, पेंटशोलिंग, पारो, थिंपू, भूतानला जाणार आहे. त्यानंतर तो सिलीगुडीमार्गे कोलकता, भुवनेश्वर, रायपूर, नागपूर, अमरावती, वाशीम, हिंगोलीमार्गे परत परभणीत येणार आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी लायन्स क्‍लबचे सदस्य संतोष नारवाणी, डॉ. प्रवीण धाडवे, राहुल सचदेव, मनोहर चौधरी, रितेश जैन, विजय दराडे, रोहित गर्जे, झेड. आर. मुथा, श्रीकांत मनियार, प्रवीण मुदगलकर, अवी टाक, सचिन अग्रवाल यांच्यासह शैलेश कुलकर्णीचा परिवार उपस्थित होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth Bullet Journey for plastic free